esakal | डिझेलचे दर गगनाला; ट्रॅक्टरची शेती तोट्याला 

बोलून बातमी शोधा

farme}

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे शेती तोट्यात जात आहे. त्यात अगोदरच राज्यकर्ते, निर्यात धोरण, शासकीय यंत्रणा, पतपुरवठा धोरण यांमुळे शेती तोट्यात जात आहे.

डिझेलचे दर गगनाला; ट्रॅक्टरची शेती तोट्याला 
sakal_logo
By
महेंद्र खोंडे

तऱ्हाडी : देशभरात डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रास त्याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील शेतीव्यवसायही यातून सुटला नाही. डिझेलचे दर ८३ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढल्याने शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असलेल्या ट्रॅक्टरने मशागतीचे दरही वाढले आहेत. यामुळे शेतीचा वाढता खर्च आणि मिळणारे बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती आणखी तोट्यात जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आवश्य वाचा- धुळ्यात महापालिकेची मोहीम; ५३ हजार बालकांना पोलिओ डोस 
 

पूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने केली जायची. यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी कामे व्हायची. प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवीत. बैलांची जास्त संख्या असेल तर शेतकरी मोठा समजला जायचा आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही असे समीकरण होते. मात्र बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण येऊन शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर घुसला. मागील दशकापासून शेतीत आमूलाग्र बदल होऊन चार दिवसांची कामे एक तासात व्हायला लागली, एक पीक काढले की अवघ्या एक दिवसात मशागत करून दुसरे पीक उभे राहील, अशी साधने निर्माण झाली. यामुळे नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक, रोटर फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहेत. 

आवर्जून वाचा- राजकीय संकुचित वृत्तीतून विकासाचा ‘फुटबॉल’ 
 

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

मात्र आज डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांनी कामांचे दर वाढविले आहेत. डिझेल महाग झाल्यामुळे येणारा पैसा त्यात खर्च होत असल्यामुळे चार पैसे शिल्लक राहावेत म्हणून मशागतीचे दर वाढले आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे शेती तोट्यात जात आहे. त्यात अगोदरच राज्यकर्ते, निर्यात धोरण, शासकीय यंत्रणा, पतपुरवठा धोरण यांमुळे शेती तोट्यात जात आहे. त्यात डिझेलच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांना तोट्यात आणत आहेत. यामुळे शेतीला पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवरील कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 
 

मशागतीचे दर 
प्रतिएकर 
नांगरणी १,८०० रुपये 
रोटाव्हेटर २,००० रुपये 
फणणी १,६०० रुपये 
वाफे तयार करणे १,६०० रुपये 
सरी पाडणे १,००० रुपये 

हेही वाचा- नंदुरबार जिल्‍ह्‍यात कृषिपंप वीजबिलांची ७५४ कोटी थकबाकी 
 

शासनाने शेतीच्या कामासाठी वापरत असलेल्या अवजारांना मिळणारे डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 
-विशाल करंके, शेतकरी, तऱ्हाडी 

डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करावयाच्या कामांचे दर वाढवावे लागले. खर्च आणि शिल्लक यांचा ताळमेळ बसत नसल्याने दर वाढले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 
-शांतिलाल पाटील, ट्रॅक्टर व्यावसायिक तऱ्हाडी.

 

संपादन- भूषण श्रीखंडे