
प्रकल्पाधिकारी अविशांत पंडा यांनी तत्कालीन मुख्याध्यापक बी. आर. महाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.
तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जांभाई (ता. तळोदा) येथील शासकीय आश्रमशाळेच्या तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापकांकडून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेत खरेदी करावयाच्या व्यवहारात अनियमितता प्रकरणात प्रभारी मुख्याध्यापकांनी सादर केलेला खुलासा अमान्य करीत, त्यांच्याकडून दोन लाख दोन हजार ४८४ रुपये वसूल करण्याचे आदेश प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिले आहेत.
या शासकीय आश्रमशाळेला काही महिन्यांपूर्वी तळोदाचे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी भेट देत तेथील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांना शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी)अंतर्गत करण्यात आलेल्या अनेक वस्तुंच्या खरेदीमध्ये संशय आला होता.
मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च
प्रकल्पाधिकारी पंडा यांनी प्रकल्पाचे लेखाधिकारी एच. जी. जीभकाटे यांना याबाबत सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार श्री. जीभकाटे यांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालात तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक बी. आर. महाले यांनी विविध साहित्य खरेदी व विविध बाबींचा दुरुस्तच्या कामाबाबत केलेल्या विविध खर्चाच्या नोंदी न घेतल्याचे, तसेच खरेदी किमती या बाजार भावाचा विचार न करता अवाजवी दराने खरेदी केल्याचे आढळून आले होते. तसेच तीन लाख २५ हजारांपेक्षा जास्त निधी खर्च केल्याचे निदर्शनास आले होते. त्यातही अत्यंत तातडीच्या बाबींसाठी १५ हजार रुपये व वसतिगृहाच्या अधीक्षिकांकडे पाच हजार रुपये पेटी कॅश ठेवण्याची कार्यपद्धती असताना या सर्व बाबतीत बी. आर. महाले यांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे निदर्शनास आले होते.
खुलासा अमान्य
प्रकल्पाधिकारी अविशांत पंडा यांनी तत्कालीन मुख्याध्यापक बी. आर. महाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार श्री. महाले यांनी खुलासा सादर केला होता. त्यातील काही मुद्द्यांचा खुलासा मान्य करण्यात आला. मात्र, काही मुद्द्यांचा खुलासा अमान्य करीत त्यांच्याकडून दोन लाख दोन हजार ४८४ रुपये वसूल करण्याचे आदेश पंडा यांनी दिले आहेत.
२० हप्त्यांत रक्कम जमा करण्यात येईल
बी. आर. महाले यांच्याकडून वसूल करण्यात येणारी रक्कम एकूण २० हप्त्यांत त्यांच्या दरमहा वेतनातून वसूल करण्यात येणार आहे. त्यात १९ हप्ते रक्कम दहा हजार १३० प्रमाणे व एक हप्ता रक्कम दहा हजार १४ प्रमाणे वसूल करण्यात येणार आहे. तसेच सदर रक्कम ही शासनदरबारी जमा करण्यात येणार आहे.
जांभाई येथील आश्रमशाळेला भेट दिली असता, हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाला खुलासा सादर करण्याचे सूचित केले होते. चौकशीत काही मुद्द्यांचा खुलासा अमान्य करीत त्यांच्याकडून दोन लाख दोन हजार ४८४ रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. आश्रमशाळांचा कुठल्याही कामांमध्ये गैरप्रकार आढळून आला, तर यापुढेही संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
-अविशांत पंडा, प्रकल्पाधिकारी, तळोदा
संपादन- भूषण श्रीखंडे