निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता तळोदा बंद !

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

तळोदा तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहरवासीयांना याबाबत सूचना देण्याचे आदेश देण्यात आले.

तळोदा  : निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता संपूर्ण तळोदा तालुका आज दुपारी ३ वाजेपासून ते उद्या गुरुवारी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचा सूचना देण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोठेही नुकसान झाल्यास ग्रामसेवक, तलाठी यांना त्वरित पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम नंदुरबार जिल्हा, तळोदा तालुक्यात जाणवू शकतो हे लक्षात घेता आज सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, मुख्याधिकारी सपना वसावा, नगराध्यक्ष अजय परदेशी, नायब तहसीलदार शैलेश गवते, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सभापती यशवंत ठाकरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. जे. वळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी आर. बी. सोनवणे, वीज वितरण कंपनीचे सचिन काळे आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत आज बुधवारी दुपारी ३ वाजेपासून ते उद्या गुरुवारी संपूर्ण दिवस तळोदा तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहरवासीयांना याबाबत सूचना देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच जुनी घर, कच्ची घरे, पत्र्याचे घर असलेल्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विपरीत परिस्थिती उदभवल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत सूचना करण्यात आल्यात व त्यासाठी जिल्हा परिषद, खाजगी शाळा अधिग्रहण करण्याचा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. या काळात वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, तलाठी, बांधकाम विभाग कर्मचारी, वीज वितरण कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडू नये असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काही विपरीत घडले तर त्वरित स्थानिक पातळीवर अथवा उपविभागीय कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे.... 

बोरद, प्रतातपुर, सोमवल व वाल्हेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तयार करण्यात आले असून त्यात वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, शिपाई व वाहन चालक आदींचा समावेश आहे. ज्या ठिकाणी गरज भासेल त्या ठिकाणी आरोग्य पथकाला त्वरित पाठविण्यात येईल. 

डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Considering the potential danger of nisarga hurricanes, the lake closes