"लाडली'च्या विरहातून पित्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

तळोदा : लाडकी मुलगी शिकण्यास लांब गेल्याच्या विरहातून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालदा (ता. तळोदा) येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

तळोदा : लाडकी मुलगी शिकण्यास लांब गेल्याच्या विरहातून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालदा (ता. तळोदा) येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
मालदा (ता. तळोदा) येथील मनोहर लगनदास खर्डे (वय 35) यांची सहावीतील पायल ही तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकलव्य मॉडल रेसिडेन्शिअल स्कूल या योजनेत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली. तिचा मुंडेगाव (ता. इगतपूरी) येथील आदर्श विद्यालयात "निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत शिक्षण' या योजनेखाली निवड झाली. तिला नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने 20 जूनला श्री. खर्डे हे स्वत: मुलीला आवश्‍यक साहित्यासह मुंडेगाव येथील शाळेत सोडले. ते तेथे एक दिवस मुक्कामी राहून 21 जूनला मालदा येथे परतले. मात्र, घरी आल्यानंतर आपली मुलगी शिकण्यासाठी एवढ्या लांब गेली म्हणून तिच्या आठवणीने ते अस्वस्थ होते. नातेवाइकांनी त्यांची समजूत काढली. मुलगी नामांकित शाळेत इंग्रजी माध्यमात शिकल्यानंतर तिचे व घराचे कल्याण होईल, प्रगती होईल, तेव्हा ते शांत झाले. त्यानंतर रात्री जेवणानंतर ते बाहेर गेले. ते परत आलेच नाहीत. घरच्यांना ते नेहमीप्रमाणे शेतात गेले असतील, असे वाटले; परंतु सकाळी त्यांचे वडील शेतात गेले असता, त्यांना मनोहर यांनी स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात दिलीप खर्डे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक हवालदार जेरमा पावरा तपास करीत आहेत. खर्डे हे मालदा येथील सधन शेतकरी होते. पायल हुशार असल्याने मनोहर खर्डे यांची अतिशय लाडकी होती.

Web Title: marathi news taloda father sucide