सरपंच पदासाठी आता कोण..आरक्षणाची तयारी

फुंदीलाल माळी | Friday, 4 December 2020

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यानुसार नंदुरबार तालुक्यातील 41 व शहादा तालुक्‍यातील 35 अशा एकूण 76 बिगर आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

तळोदा (नंदुरबार) : नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे 2020 ते 2025 या पाच वर्ष कालावधीचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार नंदुरबार व शहादा तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील 76 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील एकूण 595 ग्रामपंचायतीचे केवळ महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यात कोणत्या ग्रामपंचायतीचे आरक्षण काय निघणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यानुसार नंदुरबार तालुक्यातील 41 व शहादा तालुक्‍यातील 35 अशा एकूण 76 बिगर आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नंदुरबार तालुक्यात अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमातीसाठी एक, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 11 व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 28 सरपंच पदे निश्चित करण्यात आले आहेत. तर शहादा तालुक्यातील 35 सरपंचपदांमध्ये अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमातीसाठी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी 10, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 22 सरपंच पदे निश्चित करण्यात आली आहेत.
दुसरीकडे आदिवासी क्षेत्रातील सर्वच ग्रामपंचायतींचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने त्या क्षेत्रात केवळ महिला आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील व बिगर आदिवासी क्षेत्रातील एकूण 595 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिला आरक्षण काढले जाणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार असल्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या नजरा या आरक्षणावर लागून आहेत. कोणत्या ग्रामपंचायतीत महिलाराज येणार तर कोणाची सोय होणार व कोणाची गैरसोय होणार याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

सरपंच पदाचे आरक्षणाचा कार्यक्रम
- बिगर आदिवासी क्षेत्रातील- नंदुरबार तालुका- 41 ग्रामपंचायती- आरक्षण काढण्याचा दिनांक - 7डिसेंबर - स्थळ- तहसील कार्यालय नंदुरबार
- बिगर आदिवासी क्षेत्रातील - शहादा तालुका -35 ग्रामपंचायती आरक्षण काढण्याचा दिनांक- 7डिसेंबर- स्थळ- तहसील कार्यालय शहादा
- बिगर आदिवासी व आदिवासी क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा एकूण -595 ग्रामपंचायती- केवळ महिला आरक्षण काढण्याचा दिनांक- 11 डिसेंबर - स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार

संपादन ः राजेश सोनवणे