दुकानांवर गर्दी नको...गरजेच्या वस्तूंचा पुरवठा होईलच !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित रित्या होईल, नागरिकांनी दुकानावर विनाकारण गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले.

तळोदा  : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल, साठेबाजी करून कोणीही काळाबाजार करणार नाही , मेडिकल सेवा व्यवस्थित रित्या सुरू राहावी , पाचपेक्षा अधिक माणसे जवळ येणार नाही , सर्व प्रकारची हॉटेल्स बंद ठेवण्यात यावी त्यासंबंधी देखरेख ठेवण्याचे निर्देश तालुक्यातील सर्व यंत्रणांना सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिले.

उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , तहसीलदार पंकज लोखंडे ,पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण , गट विकास अधिकारी सावित्री खर्डे, मुख्याधिकारी सपना वसावा व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरातील व तालुक्यातील जनतेने उस्फूर्तपणे जनता कर्फ्यू यशस्वी केला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून जिल्‍ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्या परिस्थितीचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात येऊन निर्देश देण्यात आले आहेत. शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित रित्या होईल, नागरिकांनी दुकानावर विनाकारण गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले.

बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी शहरात फेरी मारून परिस्थिती जाणून घेतली. जीवनावश्यक वस्तू व मेडिकल दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. केवळ भाजीपाला ,दूध ,मेडिकल दुकाने सुरू होती. इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सकाळी काही दुकानदारांनी दुकान उघडण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना समज देण्यात येऊन दुकान बंद करण्यास सांगितले. त्यानंतर दुकाने बंद झाल्याने रस्त्यांवरील गर्दी देखील कमी झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Supplies will be available Don't want to rush to the shops