esakal | जिद्द- दिवसा गटई कामगार, रात्री हॉस्पिटलची आया 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

जिद्द- दिवसा गटई कामगार, रात्री हॉस्पिटलची आया 

sakal_logo
By
विजयकुमार इंगळे

   अल्प शिक्षण, मोलमजुरीवर कुटुंब चालविताना होणारी ओढाताण, कुटुंबाला पुढे नेण्याचा निर्धार अन्‌ पतीच्या खांद्याला खांदा लावून कष्टाला देव मानत संसाराचा गाडा पुढे नेला. अर्ध्यावरच पतीने साथ सोडली. कुटुंबाचे स्वप्न साकार करायचे ही मनात जिद्द. दिवसा गटई कामगार, तर रात्री हॉस्पिटलची आया बनून कुटुंबाला स्थैर्य प्राप्त करून देण्याचे काम केले सोनूबाई अहिरे यांनी... 


   सोनूबाई अहिरे...वय 40... माहेर देवळा तालुक्‍यातील पिंपळगाव वाखारी, तर सासर धुळे जिल्ह्यातील देऊर.. सध्या वास्तव्य नाशिकमधील टाकळी येथे. परिस्थितीमुळे शाळेची पायरी न चढलेल्या सोनूबाई. वडील रामदास संभाजी अहिरे यांच्याकडे अठराविश्‍व दारिद्य्र. दोन मुली आणि तीन मुलांच्या कुटुंबात सोनूबाई लहान. रोजच्या खायची भ्रांत. माहेरच्या परिस्थितीमुळे 1995 मध्ये म्हसदी येथील दादाजी अहिरे यांच्याशी लग्न झाले. दादाजी यांचेही शिक्षण दहावी नापास. 

  पती, पत्नीसह घरात सासू-सासरे अशा कुटुंबात सोनूबाई यांनी कष्टालाच देव मानले. शिवारात शेतमजुरी किंवा मिळेल ते काम केले. मात्र, रोजचा मिळणारा पगार जेमतेम. अहिरे कुटुंबाचा दिनक्रम सुरू असतानाच शंकर व गणेश या मुलांच्या निमित्ताने सदस्यसंख्या सहावर पोचली. खायची भ्रांत असलेल्या कुटुंबात मुलांची ओढाताण होत होती. परिस्थितीवर मात करण्यासाठी नाशिक गाठले. नाशिकच्या राजीवनगर झोपडपट्टीने कुटुंबाला आधार दिला. पती दादाजी बांधकामावर मजूर म्हणून जात होते, तर सोनूबाई राजीवनगर परिसरात धुणीभांडी करू लागल्या. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर घर चालविणे जिकिरीचे होते. दोन्ही मुलांना शाळेत दाखल करत त्यांनी मोठे व्हावे, अशी सोनूबाईंची इच्छा. मात्र, परिस्थितीमुळे शंकर व गणेश यांना अनुक्रमे नववी आणि पाचवीतच शाळा सोडावी लागली. 
याच काळात पती दादाजी यांना समाजकल्याण विभागामार्फत गटई कामगार म्हणून टपरी मिळाली.
     राणेनगर येथील थांब्यावर ही टपरी सुरू झाली. दिनक्रम सुरू असतानाच पती अचानक सोडून गेल्याने दोन्ही मुले व सोनूबाई यांचे कुटुंब उघड्यावर आले. मुलांसाठी आपणच आधार असल्याची जाणीव त्यांना असल्याने त्या यातून सावरल्या. अहिरे कुटुंबासाठी आता गटई कामगार म्हणून मिळालेली टपरीच आधार होती. पारंपरिक असलेल्या व्यवसायाची अजिबात माहिती नसताना चप्पल दुरुस्तीचे काम त्या करू लागल्या. पहिल्या दिवशी मिळालेली कमाई होती, फक्त 40 रुपये. याच दिवशी त्यांच्या कुटुंबासाठी आशेचा किरण दिसला तो चप्पलदुरुस्ती व्यवसायातून. कुटुंबावर झालेल्या आघातातून सावरत सोनूबाईंनी चप्पलदुरुस्ती व्यवसायात पाऊल टाकताना घरोघरी जाऊन धुणीभांडी करण्याचे काम बंद केले. मात्र, मुलांसाठी सुखाचे दोन घास मिळावेत म्हणून त्यांची धडपड सुरू होती. 
   राणेनगर परिसरातील उषा हॉस्पिटलमध्ये आया म्हणूनही काम करण्यास सुरवात केली. दिवसा गटई कामगार, तर रात्री हॉस्पिटलची आया म्हणून काम करत कुटुंबाला पुढे नेले. मोठा मुलगा शंकर याने वाहन दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत पाथर्डी फाटा परिसरात स्वमालकीचे दुकान सुरू केले, तर धाकटा नारायणगाव येथे शोरूममध्ये नोकरी करतो. शंकर व गणेश यांचे विवाह झाले असून, एके काळी झोपडपट्टीतही भाडेतत्त्वावर घर न मिळालेले अहिरे कुटुंब आज स्वमालकीच्या घरात टाकळी येथे गुण्यागोविंदाने राहत आहे. 

खचून जाऊ नका! 
कुटुंबावर आलेल्या प्रसंगातून स्वतःला सावरत इतरांसाठी सोनूबाई आदर्श ठरल्या आहेत. आज आयुष्यातील 22 वर्षे गटई कामगार म्हणून काम करतानाच हॉस्पिटलच्या निमित्ताने नागरिकांची सेवा करताना मिळणारे समाधान मोठे आहे, असे सांगताना त्यांचे डोळे भरून येतात. मनुष्यजन्म एकदाच मिळतो. परिस्थिती कशीही असली, तरी त्यातून मार्ग सापडतोच. महिलांनी खचून जाऊ नये, असा सल्ला त्या देतात. ज्या व्यवसायातून कुटुंबाला सावरू शकले, तो व्यवसाय आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंद करणार नाही, असेही अभिमानाने त्या सांगतात. 
संपर्क ः सोनूबाई अहिरे- मो. 7741936465 

loading image
go to top