तांबटलेनमधील  गुप्तावाडा कोसळला,दुचाकीस्वार बचावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

जुने नाशिक ः तांबटलेनमधील गुप्तावाडा कोसळल्याची घटना आज  सकाळी घडली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्याने जाणारा दुचाकीचालक थोडक्‍यात वाचल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. 

जुने नाशिक ः तांबटलेनमधील गुप्तावाडा कोसळल्याची घटना आज  सकाळी घडली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्याने जाणारा दुचाकीचालक थोडक्‍यात वाचल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. 

   यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सुमारे 15 वाडे कोसळले आहेत. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास गुप्तावाडा अचानक कोसळण्याचा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. रात्री याच वाड्याची मागील बाजूच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याची माहिती नागरिकांनी दिली. शेजारील शेटे वाड्याच्या मोकळ्या जागेत गुप्तावाडा कोसळला. येथील रस्ता रहदारीचा असतो. मात्र सकाळी वाहतूक नसल्याने हानी टळली. एक महिन्यापूर्वी शेटेवाडा धोकादायक झाल्याने त्यानी स्वतःहून संपूर्ण वाडा उतरवला होता. त्यामुळे शेटे वाड्याच्या जागी केवळ मोकळा भूखंड राहिला होता. शेटे आणि गुप्तावाड्याची सामाईक भिंत असल्याने एकमेकाना आधार होता. पण शेटे वाडा उतरविल्याने गुप्ता वाड्याचा आधार गेला. त्याचाभागही धोकादायक झाल्याने गुप्ता कुटुंबीय महिनाभरापूर्वीच वाडा सोडून स्थलांतरित झाले होते. तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वाड्याचा भाग खचला होता. 

दुचाकी चालक बचावला 
गुप्ता वाडा सकाळी कोसळला त्यावेळी एक दुचाकी चालक तेथून जात होता. दुचाकी चालक थोडा पुढे सरकला आणि वाड्याचा भाग अचानक कोसळला. अवघ्या एक मिनिटांच्या फरकाने वाडा कोसळल्याने दुचाकी चालक बालबाल बचावला. तो पुढे जाताच आवाज झाल्याने त्याने मागे फिरुन पाहिले असता वाडा कोसळल्याचे त्याला दिसल्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली अशा प्रकारची त्याची आवस्था झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगीतले. 

काळे वाड्याची झाली आठवण 
वर्षभरापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेस गुप्तावाड्यास लागून असलेला काळेवाडा कोसळला होता. त्यात समर्थ काळे आणि करण घोडके दोघा मित्रांचा फेंन्डशीप डे च्या दिवशीच मृत्यू झाला होता. उद्या उजाडणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या 1 तारीखेच्या आधल्या दिवशी तेथील गुप्ता वाडा कोसळल्याने परिसरातील नागरीकाना काळेवाडा कोसळण्याच्या घटनेची आठवण झाली. 

बुधवारी सकाळी 8 वाजेला पाच मिनिट कमी असताना मी दुकान उघडण्यास आलो. आणि 8 वाजेच्या सुमारास वाडा कोसळण्याचा आवाज झाला. सकाळी कुणी नसल्याने अनर्थ टळला. दुचाकी चालक मात्र थोडक्‍यात बचावला 
दिपक गायखे (प्रत्यक्षदर्शी) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news THAMBAT LANE WADA