टोमॅटोच्या दराला चढली लाली, वीस वर्षांनंतर दर प्रतिक्रेट 900 रुपये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पिंपळगाव बसवंत ः टोमॅटोच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोला प्रतिक्रेट 900 रुपये असा आकर्षक दर मिळाला. वीस वर्षांनंतर टोमॅटोच्या भावाला एवढी लाली चढली. मागणीत वाढ झाल्यास टोमॅटोचे दर प्रतिक्रेट हजार रुपयांपर्यंत झेप घेऊ शकतात. 
टोमॅटो उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम चांदी करणारा ठरत आहे.

पिंपळगाव बसवंत ः टोमॅटोच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोला प्रतिक्रेट 900 रुपये असा आकर्षक दर मिळाला. वीस वर्षांनंतर टोमॅटोच्या भावाला एवढी लाली चढली. मागणीत वाढ झाल्यास टोमॅटोचे दर प्रतिक्रेट हजार रुपयांपर्यंत झेप घेऊ शकतात. 
टोमॅटो उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम चांदी करणारा ठरत आहे.

\हंगामाच्या प्रारंभीपासूनच टोमॅटो भाव खात आहे. पंधरा दिवसांपूर्वीची किरकोळ पडझड वगळता दराचा आलेख उंचावत आहे. पिंपळगाव बाजार समितीत शुक्रवारी टोमॅटोच्या दीड लाख क्रेटची आवक झाली. देशभरातून मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये टोमॅटो खरेदीसाठी चढाओढ झाली. दोन दिवसांच्या तुलनेत दरात 200 रुपये प्रतिक्रेटने वाढ होऊन दर तब्बल 900 रुपयांपर्यंत पोचले. सरासरी 700 रुपये असा 20 किलोच्या क्रेटला दर मिळाला, तर 45 रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. यापूर्वी 1998 मध्ये टोमॅटोचे दर असे कडाडले होते. तब्बल 20 वर्षांनंतर टोमॅटोच्या दराला ही झळाळी मिळाली आहे. 

उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आदी राज्यांतील टोमॅटोचा हंगाम लवकर संपला आहे. देशभराच्या टोमॅटो मागणीची भिस्त नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव बाजारपेठेवर आहे. दिल्ली, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यांमधून मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरात जोरदार तेजी आली. टोमॅटोला सोन्याचा भाव आल्याने कांद्याबरोबर आता टोमॅटोही भाव खाऊ लागला आहे. 

अगोदर दुष्काळ व नंतर मुसळधार पाऊस अशा दुहेरी संकटात नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, दिंडोरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. त्यांच्या कष्टाला फळ मिळाले आहे. टोमॅटोचे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची विक्रमी दरामुळे आर्थिक लाल क्रांती झाली आहे. नवरात्रोत्सवात टोमॅटोला मिळणाऱ्या आकर्षक दरामुळे शेतकऱ्यांची दिवाळी धूमधडाक्‍यात होणार आहे. 

वीस वर्षांपूर्वी टोमॅटोला विक्रमी दर मिळाले होते. परराज्यातील टोमॅटोचा हंगाम संपला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने दरातील तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. 
-सोमनाथ निमसे, मातोश्री व्हेजिटेबल, पिंपळगाव बसवंत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tomoto