"हर..हर..महादेव'च्या गजरात भाविकांकडून ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 

live
live

नाशिक: "बम..बम.. भोले..', "हर.. हर.. महादेव..'च्या जयघोषात लाखो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी सहभाग नोंदविला. काल (ता.18) रात्रीपासून भाविकांचे जथ्थे त्र्यंबकेश्‍वर नगरीत दाखल होत होती. सोमवारी (ता.19) दिवसभर भाविकांची रीघ कायम राहिली. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेत सहभागी होतांना भाविकांनी निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेतली. प्रदक्षिणेपूर्वी भाविकांनी त्र्यंबकराजाच्या दर्शन, कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. 
दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

काल (ता.18) सायंकाळी शहरात पावसाने हजेरी लावल्यामुळे भाविकांची संख्या रोडावली होती. पण पावसाने उघडीप दिल्यानंतर भाविकांनी त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने पावले वळवली. त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदानाहून रात्रभर भाविकांनी भरलेल्या बसगाड्या त्र्यंबकेश्‍वरसाठी रवाना झाल्या. सायंकाळी उशीरा त्र्यंबकेश्‍वरमध्ये दाखल झालेल्या भाविकांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेत, कुशावर्तामध्ये स्नान करत ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरवात केली. प्रयाग तीर्थाला प्रदक्षिणा मारत भाविक फेरी मार्गावर दाखल झाले. गेल्या अनेक दिवसांपासून वरून राजा बरसला असल्याने निसर्गात चोहीकडे झालेली हिरवळ भाविकांचे मन प्रसन्न करणारी ठरली. पहाटेपासूनच प्रदक्षिणा पूर्ण करत पुन्हा त्र्यंबकेश्‍वर शहरात भाविक दाखल होण्यास सुरवात झाली. तर दुसरीकडे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी दाखल होणाऱ्या भाविकांचा ओघ दुपारी उशीरापर्यंत कायम होता. 

सामाजिक संस्थांकडून चहापासून सफरचंदचे वाटप 
प्रदक्षिणा घालत थकलेल्या भाविकांना ऊर्जा देण्यासाठी विविध सामाजिक संस्था सरसावल्या होत्या. गवती चहा, साबुदाणा खिचडीसह अन्य पदार्थांचे वाटप भाविकांना करण्यात आले. यंदा प्रथमच काही संस्थांकडून भाविकांना सफरचंद वाटप करण्यात आले. श्रावण महिन्याच्या सोमवार असल्याने भाविकांना केळी, राजगिऱ्याचे लाडू असे विविध उपवासाचे पदार्थ संस्थांकडून वाटप करण्यात आले. 

इन्फो: 
रिक्षाचालकांनी साधली पर्वणी 
ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या अंतीम टप्यातील मार्गात रिक्षाचालकांनी घुसखोरी केली होती. थकलेल्या भाविकांना गळ घालत रिक्षाचालकांनी दुगारवाडी फाटा (त्र्यंबक बारी) येथून त्र्यंबकेश्‍वर बसस्थानकापर्यंत प्रवासी भाविकांची वाहतूक केली.काही रिक्षाचालक थेट प्रदक्षिणेच्या सिमेंट कॉंक्रीट असलेल्या मार्गात दाखल झाल्याने पायी चालणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती. थकलेल्या भाविकांकडून रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी पैसे आकारतांना एकाप्रकारे पर्वणीच साधली. 

मंदिरात,कुशावर्तावर भाविकांची गर्दी 
दर्शनासाठी भाविकांनी त्र्यंबकराजाच्या दरबारी गर्दी केली होती. तसेच कुशावर्तावर भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे परीसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रदक्षिणेला येथूनच सुरवात होत असल्याने उत्साही भाविकांनी कपाळाला अष्टगंध लावत गळ्यात रूद्राक्षाची माळ घालत फेरीला सुरवात केली. 

ब्रह्मगिरी प्रदक्षिणेतील क्षणचित्रे.. 
*टाळ-मृदुंगाच्या गजरात भाविकांचा सहभाग 
*पावसाने उघडीप दिल्याने वाढला उत्साह 
*सहभागी महिला, युवतींची संख्या लक्षणीय 
*समुहाने भाविक झाले प्रदक्षिणेसाठी दाखल 
*निसर्गाच्या सानिध्यात सेल्फी, छायाचित्राची लगबग 
*सुरक्षेसाठी होते पोलिसांसह होमगार्ड तैणात 
*भाविकांच्या सुविधेसाठी रूग्णवाहिका होती उपलब्ध 
*एसटी महामंडळाकडून तीनशे बसगाड्यांचे नियोजन 
*प्रदक्षिणा मार्गावर प्लॅस्टिक बाटल्यांचा साचला खच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com