तलाठ्यांच्या नोंदीतून "इनाम'चा भ्रष्टाचार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

नाशिक : ब्रह्मगिरीतून उगम पावलेल्या गोदावरीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्र्यंबकेश्‍वर नगरीला महसूल यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धनाढ्यांच्या मदतीने भ्रष्टाचाराचा महापूर आणला आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील जमीन गैरव्यवहाराचे एकामागून एक प्रकरण चर्चेला येत आहे.

नाशिक : ब्रह्मगिरीतून उगम पावलेल्या गोदावरीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्र्यंबकेश्‍वर नगरीला महसूल यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धनाढ्यांच्या मदतीने भ्रष्टाचाराचा महापूर आणला आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील जमीन गैरव्यवहाराचे एकामागून एक प्रकरण चर्चेला येत आहे.

संत निवृत्तिनाथ देवस्थानच्या गट क्रमांक 354 च्या 7/12 उताऱ्यावर 1978-79 मध्ये "इनाम' हा शेरा भूधारणाखाली नोंदविला गेला असताना, तो कमी होऊन जमीन हस्तांतरित झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात वारकऱ्यांनी केलेल्या अर्जात महसूल विभागाच्या दंडाधिकाऱ्यांना तलाठ्याकडून चूक झाल्याचा खुलासा करावा लागला आहे. याचा अर्थ तलाठी व महसूल यंत्रणेच्या काही अधिकाऱ्यांच्या स्वार्थातून येथे "इनाम' जमिनीच्या हस्तांतराचा महापूर आल्याचे सिद्ध होते. 

त्र्यंबकेश्‍वर देवस्थान व संत निवृत्तिनाथ संस्थानच्या विश्‍वस्त ललिता शिंदे, खंडेराव पाटील, पांडुरंग गिरणारे, नारायण मोरे (सर्व रा. धोंडेगाव गिरणारे, जि. नाशिक) यांनी त्र्यंबेकश्‍वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या "इनाम' जमिनीचा प्रकार बदलून गैर भोगवटाधारकांच्या नावे ती जमीन केल्याप्रकरणी चौकशी होऊन न्याय मिळण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री, धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी, सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली होती. दरम्यान, तत्कालीन तहसीलदारांकडे ऑगस्ट 2016 मध्ये तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन तत्कालीन तहसीलदारांनी मंडल अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली. 

तहसीलदारांनी केला चुकीचा खुलासा 
तहसीलदारांनी केलेल्या खुलाशात नमूद केले आहे, की मौजे त्र्यंबकेश्‍वर येथील गटस्कीम पत्रकाचे अवलोकन केले असता, सर्व्हे नं. 432/अ या मिळकतीला गट नं. 354 हा देण्यात आला आहे. सर्व्हे नं. 432/अचे 1931-32 पासून 1977-78 चे 7/12 उतारे पाहिले असता, त्यावर "इनाम' हा शेरा कोठेही आढळून आलेला नाही. मात्र, 1978-79 पासूनचे 7/12 उताऱ्यावर "इनाम' हा शेरा भूधारणा पद्धतीखाली दिसतो. त्याअनुषंगाने इनाम जमिनीच्या रजिस्टरची प्रमाणित प्रत पाहिली असता, त्यात मिळकतीचा कुठेही उल्लेख नाही. 1987-88 ऍलिनेशन रजिस्टरची प्रमाणित प्रत पाहता या रजिस्टरमध्ये सर्व्हे नं. 432/अचा उल्लेख दिसून येत नाही. तसेच कसबे त्र्यंबकचे इनाम जमिनीचे रजिस्टर (नावाचा नं. 1) पाहता त्यातदेखील सर्व्हे नं. 432/अ या जमिनीचा उल्लेख नाही. गट नं. 354 या जमिनीच्या धारणा प्रकारात "इनाम' हा दाखला चुकीने घेतला आहे. सरकारी वकिलांच्या अभिप्रायातदेखील मंडल अधिकाऱ्याचा अहवाल व त्यांच्याकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांनी मंडल अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल हा ग्राह्य मानला आहे. हे सर्व पाहता "इनाम' ही नोंद चुकीची झाल्याचा खुलासा केला. 

संशय अन्‌ अनुत्तरित प्रश्‍न 
- तहसीलदारांनी दिलेल्या निकालात ऍलिनेशन रजिस्टरची प्रमाणित प्रत पाहता, सर्व्हे नं. 432/अचा उल्लेख दिसत नाही. मात्र, आदेशात गट नं. 354 कंसात सर्व्हे नं. 631, जुना सर्व्हे नं. 432/अ असा उल्लेख आहे, तसेच गटस्कीम पत्रकात सर्व्हे नं. 432/अ या मिळकतीला गट नं. 354 देण्यात आला असल्याने नमूद असल्याने आदेशातच म्हटले आहे. 
- 1931-32 पासून 1977-78 चे 7/12 उतारे पाहिले असता, त्यावर "इनाम' हा शेरा आढळत नसल्याचे नमूद केले आहे. मग 1978-79 मध्ये तलाठ्याने भूधारणा पद्धतीखाली कशी काय नोंद केली? 
 

Web Title: marathi news trambakshwar fraud