पर्यावरणानुकूल होणार ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, सकाळ,प्रशासन,संस्थांचा निर्धार 

live
live


त्र्यंबकेश्‍वर : दर वर्षी श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला येणाऱ्या लाखो भाविकांची प्रदक्षिणा आनंददायी करण्याबरोबरच स्वच्छता, सुरक्षा व पर्यावरणानुकूल घडविण्याचा निर्धार बुधवारी (ता. 22) त्र्यंबकेश्‍वर पालिकेच्या सभागृहातील बैठकीत करण्यात आला. भाविकांना प्लॅस्टिकमुक्तीच्या सूचना देऊन पर्यावरणानुकूल प्रदक्षिणा करण्याबरोबरच दुसऱ्या दिवशी प्रदक्षिणा मार्गावरील सर्व कचरा उचलण्याचेही नियोजन करण्यात आले. 

"सकाळ' माध्यम समूह, महसूल, पोलिस, पालिका प्रशासन, देवस्थान व स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून निर्मळ प्रदक्षिणेसाठी बैठक झाली. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर अध्यक्षस्थानी होते. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, तहसीलदार महेंद्र पवार, उपगराध्यक्ष स्वप्नील शेलार, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे, पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार सोनवणे यांच्यासह आरोग्य, महावितरण, पंचायत समिती आदी विभागांचे अधिकारी, नगरसेवक व सामाजिक मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निर्मळ प्रदक्षिणा अभियान राबविताना प्रदक्षिणा अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्यकर्ते व नगरसेवकांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. 

बैठकीच्या प्रारंभी मुख्याधिकारी डॉ. केरुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिसऱ्या श्रावण सोमवारच्या प्रदक्षिणा तयारीची माहिती दिली. ग्रामीण रुग्णालयाचे दिनेश सोमवंशी यांनी प्रदक्षिणेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याची तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणचे सहाय्यक अभियंता किशोर सरनाईक यांनी अखंड वीजपुरवठ्याची हमी दिली. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष श्‍याम गंगापुत्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्र ढेरगे, आयपीएल मित्रमंडळाचे बाबूराव उगले, नगरसेविका त्रिवेणी सोनवणे, मंगला आराधी, सागर वझे, श्री. पाटणकर आदींनी सूचना मांडल्या. 

"सकाळ'चे संपादक श्रीमंत माने यांनी, जगाला हरितकुंभाचे आदर्श उदाहरण आपण सर्वांनी दिले आहे. त्याची दखल तत्काळ देशातील पुढील कुंभात घेण्यात आली आहे. आपल्याला प्रदक्षिणादेखील पर्यावरणनुकूल व सुरक्षित करीत आगामी काळात तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, याचा विचार होणे आवश्‍यक आहे. यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले. 

बैठकीला विस्तार अधिकारी डी. एच. राठोड, तलाठी डी. बी. डोंगरे, कारभारी वाघ, सनी उगले, काळू भांगरे, मोहित तानपाठक, संदीप मुळाणे, स्वप्नील पाटील, उमेश राठोड, राजू लोखंडे, एस. पी. बोरसे, एन. डी. मेतकर, एन. डी. गंगापुत्र, एन. एस. कडभाने, ए. आर. काकड, एन. व्ही. परदेशी यांच्यासह सार्वजनिक मंडळे व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजय मिसर यांनी सूत्रसंचालन केले. 

पालिका, जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, आरोग्य विभाग व "सकाळ' माध्यम समूह एकत्र आल्याने स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरणानुकूलता या त्रिसूत्रीवर आधारित निर्मळ प्रदक्षिणा भाविकांसाठी आनंददायी ठरणार आहे. 
- पुरुषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष 

प्रदक्षिणा मार्गावर फिरत्या टॉयलेटची सुविधा करावी. प्रदक्षिणा काळात काही नशाबाजही येत असतात. पोलिसांनी दक्ष राहून अशा नशाबाजांचा बंदोबस्त करावा. म्हणजे महिलांनाही मोकळेपणाने या प्रदक्षिणेचा आनंद घेता येईल. 
- स्वप्नील शेलार, उपनगराध्यक्ष 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिकेने प्रदक्षिणेसाठी भाविकांना सुविधा देण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. स्वच्छता, आरोग्य सुविधा देण्याबरोबरच प्रदक्षिणा मार्गावरील शहरातील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. 
डॉ. चेतना केरुरे, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्‍वर 

तिसऱ्या सोमवारच्या प्रदक्षिणेनंतर त्र्यंबकेश्‍वर शहरातील सर्व संस्थांचे कार्यकर्ते मार्गावर स्वच्छता मोहीम राबवितात. या मोहिमेत सर्व सरकारी अधिकाऱ्यांनीही सहभागी व्हावे, तसेच पालिकेने स्वच्छतेसाठीचे साहित्य पुरवावे. 
- बाबूराव उगले, सामाजिक कार्यकर्ते 

निर्मळ प्रदक्षिणेसाठी 
* कुशावर्तावर भाविकांच्या सुरक्षेसाठी देवस्थानतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे 
* तिसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसर व कुशावर्त परिसरात वाहनबंदी 
* शहरातील प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटविणार 
* त्र्यंबकेश्‍वर व संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर अखंड वीजपुरवठा 
* विजेची सोय नसलेला भाग वगळता इतर ठिकाणी विजेच्या दिव्यांची सोय 
* प्रयाग तीर्थ येथील बोगद्यात वीजप्रकाश 
* मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून तात्पुरता कोंडवाडा 
* प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या 
* भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था 
* स्वच्छतेसाठी पाच टीम 
* आरोग्यसेवेसाठी पाच टीम; त्यात डॉक्‍टर, आरोग्यसेविका व परिचर यांचा समावेश 
* प्रदक्षिणेच्या दुसऱ्या दिवशी (ता. 28 ऑगस्ट) संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरील कचरासंकलन 
* प्रदक्षिणा मार्गावरील ग्रामपंचायतीचा स्वच्छता राखण्यासाठी सहभाग 


कुशावर्तावरील पाणी शुद्ध 

तीर्थराज कुशावर्तात तासाला दहा लाख लिटर पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणा बुधवारपासून कार्यान्वित झाली आहे. या ठिकाणी पालिका पदाधिकारी व प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याचे फलित बुधवारी भाविकांना प्रामुख्याने दिसले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कुशावर्तावरील पाण्याची चाचणी घेऊन ती पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दाखवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com