...अन्‌ मालेगावकरांचा अटलजींना पाच लाखांचा निधी 

residentional photo
residentional photo

मालेगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची 1982 मध्ये राष्ट्रनेता गौरव निधी जमा करण्यासाठी येथील किदवाई रस्त्यावर जाहीर सभा झाली होती. सभेत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर "कांग्रेस की लाइट जाएगी, आप भाजप की बॅटरी से चार्ज करवा लो' असे उद्‌गार वाजपेयी यांनी सभेत काढताच एकच हशा पिकला, अशी आठवण भाजपचे तत्कालीन शहर सरचिटणीस रवींद्र बापट, माजी अध्यक्ष भरत पोफळे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. या सभेत त्यांना चार लाख 51 हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे तत्कालीन अध्यक्ष रूपेश कांकरिया यांनी सांगितले. 

वाजपेयी 1966 व 1982 असे दोनदा मालेगाव भेटीवर आले होते. 66 च्या आठवणी सांगणारे बहुसंख्य नेते काळाच्या पडद्याआड गेले. 82 चा दौरा मात्र आठवणीत आहे. वाजपेयी यांनी तत्कालीन अध्यक्ष प्रल्हाद शर्मा यांच्या निवासस्थानी मुक्काम केला होता. संगमेश्‍वर येथील पक्ष कार्यालय भावसार मढी येथे त्यांनी भेट दिली होती. संगमेश्‍वरच्या भेटीत त्यांनी तत्कालीन भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा फातमाबी शेख यांच्या घरी भाकरी, मेथी, कढीचे भोजन घेतले. भोजनासाठी मुस्लिम पद्धतीने टाकलेले दस्तरखान व हात धुण्यासाठी सिलपची (हात धुण्याचे भांडे) आणल्यानंतर हीच तर आपली संस्कृती आहे, असे उद्‌गार त्यांनी काढले होते, असे (पै.) शेख यांचे पुत्र मुजफ्फर शेख यांनी सांगितले. 

पोपटराव हिरे जिल्हाध्यक्ष, तर ज्येष्ठ नेते बापूसाहेब पोफळे जिल्हा उपाध्यक्ष होते. सुकदेव पाटील तालुकाध्यक्ष होते. रवींद्र बापट, ओमप्रकाश हेडा, भरत पोफळे, विलास मिठभाकरे, भरत सावळे अशी तरुणांची फळी कार्यरत होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी चार लाख 51 हजारांचा निधी दिल्यानंतर "मुझे परास्त करणे के लिए विरोधीयोंने 36 करोड खर्चा किया और तुम मुझे चार लाख 51 हजार दे रहें हो,' असे त्यांनी कार्यकर्त्यांना हसत सांगितले. पक्षाशी एकनिष्ठ राहा हे सांगण्यास ते विसरले नाहीत, अशी आठवण कांकरिया यांनी सांगितली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com