सप्तशृंगगडावर "फनिक्‍युलर ट्रॉली'चे 4 मार्चला लोकार्पण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

वणी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या "फनिक्‍युलर ट्रॉली'चा लोकार्पण सोहळा 4 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. 

वणी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या "फनिक्‍युलर ट्रॉली'चा लोकार्पण सोहळा 4 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. 

सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांमधून दर वर्षी 50 ते 60 लाखांपर्यंत भाविक हजेरी लावतात. देवीचे मंदिर डोंगरकड्याच्या मध्यभागी असून, पायथ्यापासून 100 मीटर उंचीवर आहे. सध्या भाविकांना पायथ्यापासून दर्शनासाठी सर्वसाधारण 550 पायऱ्या चढून जावे लागते. वृद्ध, दिव्यांग, आजारी, गरोदर महिला, लहान मुले यांना या पायऱ्या चढणे त्रासदायक असल्याने असे बहुतेक भाविक पहिल्या पायरीवरून, तर काही डोली करून देवीचे दर्शन घेतात. अशा भाविकांबरोबरच सुखकर व जलदगतीने दर्शनाची इच्छा असणारे भाविकांची फनिक्‍युलर ट्रॉलीची प्रतीक्षा संपली आहे.

4 मार्चला ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा जवळपास निश्‍चित झाला आहे. यासाठी 21 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी, कळवणचे तहसीलदार, सप्तशृंगीदेवी ट्रस्ट, सप्तशृंगगड ग्रामपंचायत, गुरुबक्षानी कंपनीचे प्रतिनिधी आदींची बैठक बोलावून सप्तशृंगगडावरील फनिक्‍युलर ट्रॉलीचे उद्‌घाटन व प्लॅस्टिकबंदी, स्वच्छता मोहीम याबाबत आढावा घेऊन आवश्‍यक सूचना केल्या. तसेच 4 मार्चला उद्‌घाटनाची तारीख निश्‍चित केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होईल. त्यासाठी पत्रव्यवहार करून प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या फनिक्‍युलर रोप-वेचे काम 2009 पासून सुयोग गुरुबक्षानी कंपनी या कंपनीने खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू केले होते. हे काम अनेक शासकीय परवानग्या, तांत्रिक अडचणी,

आर्थिक अडचणींचा सामना करीत सहा महिन्यांपासून सर्व प्रकारच्या यशस्वी चाचण्या करीत पूर्णत्वास गेला आहे. मात्र, किरकोळ स्वरूपाची बाकी असलेली कामे, अंतिम परवानगी व उद्‌घाटनाची तारीख निश्‍चित होत नसल्याने भाविकांची प्रतीक्षा वाढत चालली होती. मात्र, प्रशासकीय पातळीवर उद्‌घाटन कार्यक्रमावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याने भाविकांत समाधान व्यक्त केले जात आहे. 

साठ व्यक्ती अन्‌ 176 मीटर लांबीचा मार्ग 
फनिक्‍युलर ट्रॉलीमध्ये साठ व्यक्तींना वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यासाठी 176 मीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात आला आहे. ट्रॉलीद्वारे प्रवास करण्यासाठी भाविकांना तीन मिनिटांचा कालावधी लागेल. या ट्रॉलीच्या माध्यमातून प्रतितास 1200 व्यक्तींची वाहतूक होणार असल्याने यात्रोत्सवादरम्यान रांगेत होणारी भाविकांची कोंडी कमी होईल. या प्रकल्पांतर्गत प्रवासी प्रतीक्षालय, नोंदणी कक्ष, कर्मचारी कक्ष, फलाट, निवास व्यवस्था, भाविकांसाठी 24 सर्वसाधारण व सहा व्हीआयपी सूट, स्वच्छतागृह, पार्किंग सुविधा, उपाहारगृह, अंतर्गत रस्ते, सुशोभीकरण आदी कामे 98 टक्के पूर्ण झाली आहेत. 
 

Web Title: marathi news vani faniqular traoly