पतसंस्था काढून खातेदारांची आर्थिक फसवणूक, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नाशिक : देवळाली कॅम्प येथे विद्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून, खातेदारांकडून घेतलेल्या ठेवींवर मुद्दल व त्यावरील व्याज न देता तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : देवळाली कॅम्प येथे विद्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून, खातेदारांकडून घेतलेल्या ठेवींवर मुद्दल व त्यावरील व्याज न देता तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आर्थिक फसवणूक दडविण्यासाठी संशयितांनी पतसंस्थेचे नाव बदलून ते नाशिकमध्ये स्थलांतर केले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीसात 15 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक रमेशकुमार ठाकूरदास चक्रवर्ती (रा. आडकेनगर, आनंदरोड, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित ज्योती सुहास जोशी (45, रा. जगताप मळा, नाशिकरोड), तेजा रवी पारोडकर (40, रा. दत्तमंदिर रोड, नाशिकरोड), अंजली विवेक बापट (रा. बिटको फॅक्‍टरीमागे, नाशिकरोड), आरती आल्हाद जोशी (34, रा. वसई पश्‍चिम, जि. पालघर), सुषमा रमेश कारले (45, रा. शिखरेवाडी, नाशिकरोड), डॉ. अलका अरुण खाजी (42, रा. इंद्रायणी सोसायटी, देवळाली कॅम्प), शुभदा उत्तमकुमार जोशी (41, रा. दत्तमंदिर रोड, नाशिकरोड), शरयू शिरीष बर्वे (35, रा. पांढुर्ली, ता. सिन्नर, जि. नाशिक), सीमा संजय ढोकगावकर (38, रा. उपनगर, नाशिक), सुषमा सतीश कुलकर्णी (45, रा. लॅम रोड, भगूर), अश्‍विनी विकास वैद्य (43, रा. इंद्रायणी सोसायटी, देवळाली कॅम्प), स्मिता किरण मराठे (47, रा. विजयनगर, देवळाली कॅम्प), अमरया अभय देशमुख (42, रा. शिखरेवाडी, नाशिकरोड), प्राची अरुण पेडसे (40, रा. जेलरोड, नाशिकरोड, नाशिक) यांनी संगनमत करून देवळाली कॅम्प येथे विद्या महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली होती. 

या पतसंस्थेमध्ये त्यांनी परिसरातील नागरिकांकडून पैसे जमा करून त्यांना खातेदार केले होते. तसेच, त्यांच्याकडून ठेवी ठेवून घेत त्यांना व्याजही देणार होते. मात्र, संशयितांनी पतसंस्थेतील ठेवींच्या मुद्दलीवर व्याज न देता, जमलेल्या पाच लाख रुपयांचा अपहार केला. तसेच, संशयित महिला संचालकांनी विद्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव बदलून नंदिनी नागरी सहकारी पतसंस्था असे केले. त्याचे कार्यालय पंचवटीमध्ये स्थलांतरित केले.

   त्यांनी केलेला पाच लाखांचे अपहार करून तो दडविण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात 15 जणांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: marathi news vidhya patsanstha