सरस्वतीचा वरदहस्तप्राप्त "विद्ये'च्या भाळी सर्वगुणसंपन्नेचा "टिळा' 

अमोल भट
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

गजानन महाराजांच्या श्री गजानन विजयग्रंथाचे सर्व 21 अध्याय, 3669 ओव्यांसह विद्याताईंना मुखोद्‌गत आहेत. दासगणू महाराज, सच्चिदानंद बाबा, वामनशास्त्री असे नुसते नामोल्लेख न करता त्या संदर्भात विशेष माहिती विद्याताईंच्या माध्यमातून पिपासू वृत्तीने श्रवण करणाऱ्या गजाननभक्तांना प्राप्त होत आहे. 

जळगाव : श्री सरस्वती म्हणजे विद्या आणि कलेची देवता. संत ज्ञानेश्वरांनी "अभिनव वाग्विलासिनी' तर श्री समर्थ रामदासस्वामी यांनी "शब्द मूळ वाग्देवता' अशा नामोल्लेखाने विद्येचा स्तुतिपाठ गायला आहे. विद्या या नावाला सार्थकता प्रदान करणाऱ्या ठाणे येथील विद्या पडवळ यांची ओळख श्रीगजानन विजयग्रंथ मुखोद्‌गत असलेल्या भक्त इतकीच मर्यादित नसून विज्ञान, उत्कृष्ट निवेदनशैली, शिवणकाम, भरतकाम या कलांमध्ये प्रभुत्व, कथाकथनकार, प्रतिभावंत नाट्यकलावंत अशी प्रतिभाही त्यांच्या अंगी आहे. 

क्‍लिक करा > निराधार वृद्धेसाठी पाझरली खाकीतील माणुसकी! 

कार्यमग्नता, श्रद्धा अन्‌ भक्ती 
आठ तास सलग कार्यक्रम करणाऱ्या विद्याताई तीन-चार तासांनंतर फक्त 15 मिनिटांची विश्रांती घेतात. अलीकडेच गारपिटीने पोळलेल्या अकोला, मलकापूर व बुलडाणा विभागात त्यांचा कार्यक्रम आखलेला होता, पण वातावरणाचे रौद्ररूप पाहून आयोजक संभ्रमित झाले आणि अचानक सगळे वातावरण निवळले. रातोरात मांडव उभारण्यात आल्या. हजार दीड हजार श्रोते जमले. महापारायण व महाप्रसादाचा सगळा कार्यक्रम निर्विघ्न पार पडला.. "ही स्वामींची कृपा', असे विद्याताई म्हणतात. वस्तुत: त्या फार आस्तिक व पूजाविधीत रमणाऱ्या नाहीत, पण श्रद्धा, प्रचिती, चोख पाठांतर, उत्कृष्ट निवेदनशैली यांच्या बळावर गजानन भक्तांच्या आग्रहाखातर श्रीगजानन विजय ग्रंथ पारायण सीडी प्रकाशित करण्यात आली आहे. 

No photo description available.

उच्चविद्याविभूषित विद्याताई 
ऑरगॅनिक केमिस्ट्री हा विषय घेऊन त्यांनी एम.एस्सी. व मराठी विषय घेऊन एम.ए. ही पदवी संपादित केली आहे. वडील दत्तात्रय उनवणे शिक्षणाधिकारी तर आई पद्मा राजे हायस्कूलच्या कलाशिक्षिका. वडिलांमुळे गणित व विज्ञान आणि आईमुळे (कुसुम) शिवणकाम, भरतकाम या कलांमध्ये प्रभुत्व तिने संपादन केले आहे. आईप्रमाणे मुलगा विशाल हा देखील आजवरच्या वाटचालीत सतत प्रथम क्रमांकावर स्कॉलर राहिला असून अमेरिकेत तो मॅरेथॉनचा उत्कृष्ट धावपटू आहे. मुलगी वेदवती ही उत्तम आर्टिस्ट असून वन्यजीव छायाचित्रणात ती आंतरराष्ट्रीय कीर्तीची पुरस्कार विजेता ठरली आहे. 

हेही पहा > दहा वर्षाचा ऋषिकेश गाजवतोय अश्‍वावर हुकूमत

सर्वच क्षेत्रात अव्वल 
विद्याताई सुरवातीपासूनच, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कायम अव्वल राहिल्या आहेत. (कै.) पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या "स्वाध्याय' परिवारातर्फे घेण्यात आलेल्या भगवद्‌गीतेवरील लेखी परीक्षेत 92 टक्के गुण मिळवून संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या सावरकरविषयक खुल्या स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम पारितोषिकाच्या त्या मानकरी ठरल्या. वक्तृत्व कलेतील विद्येचा वरदहस्त त्यांच्या शिरावर आहे. 

मानवी स्वभावाचं दर्शन 
ठाण्याच्या अत्रे कट्ट्यावर "स्वभावाला औषध नाही' हा त्यांच्या भाषणाचा कार्यक्रम खूप रंगला होता. या व्याख्यानात विद्याताईंनी माणसांचे स्वभाव राशींनुसार, स्वभावानुसार, बोटांच्या आकारानुसार व बोटांवरील अंतरावरसुद्धा कसे प्रकट होतात, इतकेच नव्हे तर माणसाच्या हस्ताक्षर व सहीवरूनसुद्धा स्वभावाचे दर्शन कसे घडते हे विनोदप्रचुर भाषणातून, हशा व टाळ्या घेत खूप रंगवून सांगितले. विद्याताईंचे पती विलास (निवृत्त अभियंता) यांची भक्कम साथ त्यांना आजवरच्या वाटचालीत लाभली आहे आणि त्या देखील घराचे कार्यक्रमपत्रक बिघडू न देता उत्तम कुटुंब व्यवस्थापनातून स्वविकास साधत आहे. 
 
"ऐश्वर्यलक्ष्मी'तील गृहलक्ष्मी 
"ऐश्वर्यलक्ष्मी' या विद्याताईंच्या घराला साजेल असंच त्यांच्या कुटुंबाचं चित्र आहे. मोठे देखणे व लोभस आणि या घराची गृहलक्ष्मी स्वत: कार्यमग्न आहे. भरपूर व्यासंग, परिश्रम आणि दीर्घोद्योगी वृत्तीमुळेच त्यांनी हे सर्व साधले आहे यात शंकाच नाही. ठाणे, मुलुंड परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ज्या कामगारांच्या गिरण्या बंद पडल्या होत्या, त्यांच्या मुलांसाठी विद्याताईंचा पुढाकार संस्मरणीय ठरला विनामोबदला काम त्यांच्या साठी करत अनोखा आदर्श आपल्या कृतीद्वारे घडवून दिला आहे. "नॅब'च्या माध्यमातून अंधांची दृष्टी बनून रीडर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 
 
शेगाव संस्थानच्या विश्‍वस्तांकडून कौतुक 
शेगाव संस्थानचे विश्‍वस्त शिवशंकरभाऊंनी एकदा विद्याताईंचे पारायण ऐकून म्हटले होते, "शब्दाला शब्द महत्त्वाचा नाही... शब्दामागचा भाव बोलण्यातून व्यक्त झाला पाहिजे. बोलणे एकसुरी होता कामा नये. हे सगळे तुम्हाला साधले आहे..' शेगावच्या गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण व विवेचन करणाऱ्या विद्याताईंना ही फार मोलाची महत्त्वाची पावतीच लाभली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidya parval shegaon sarswati jalgaon news