अपयशाची जबाबदारी...विश्‍लेषण अन्‌ आत्मचिंतन! 

अपयशाची जबाबदारी...विश्‍लेषण अन्‌ आत्मचिंतन! 

यशाचे श्रेय घेण्यासाठी सर्वच आतुर असतात.. अपयशाचे धनी व्हायला कुणी तयार होत नाही, हा सार्वत्रिक अनुभव. राजकारणही त्याला अपवाद नाही; किंबहुना राजकीय क्षेत्रात तर या संकल्पनेची तीव्रता अधिकच. तरीही, उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या पिछेहाटीची जबाबदारी स्वीकारत गिरीश महाजनांनी दाखविलेला दिलदारपणा कौतुकास्पदच. पण, याच उत्तर महाराष्ट्र व विदर्भाने राज्याच्या सत्तेचा घास भाजपपासून बऱ्यापैकी दूर नेऊन ठेवलांय.. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारून चालणार नाही, तर त्याचे विश्‍लेषण, आत्मचिंतन करून निघणाऱ्या निष्कर्षांवर उपाययोजना करण्याची जबाबदारीही पेलावी लागेल.. 

यंदाची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. राजकारण आणि महत्त्वाकांक्षा या परस्पर पूरक गोष्टी. महत्त्वाकांक्षा नसलेली व्यक्ती राजकारणात दुर्मिळच. या महत्त्वाकांक्षेतूनच सरलेल्या विधानसभेच्या टर्ममध्ये आणि निवडणुकीतून अनेकजण बाद झाले, अनेकांना जाणीवपूर्वक बाद करण्यात आलं. भाजपत तर अनेक नेत्यांच्या "एक्‍झिट'ने ते प्रकर्षाने जाणवलं. राज्यभरातील इनकमिंग, मेगागळती, युती आणि आघाडीतील बंडखोरी हेदेखील त्या अतिमहत्त्वाकांक्षेचंच प्रतीक. या सर्व घटकांचा परिणाम निकालातून दिसून आला. 
2014 ला भाजपने पक्ष म्हणून ज्या "स्पिरीट'ने निवडणूक लढली, ते पक्षासाठीचं "स्पिरीट' या वेळी "मिसिंग' होतं. संपूर्ण राज्यातही भाजपची हीच स्थिती होती. कारण, पक्षात गेल्या काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या "भरती'मुळे निष्ठावंत डावलले गेले. नेतृत्वाने स्पर्धेत असलेल्या नेत्यांना निवडणुकीपासून ठरवून बाजूला ठेवलं. केवळ "इनकमिंग'च्या भरवशावर भाजपनेतृत्व राज्य जिंकायला निघाले आणि तेथेच त्यांचा घात झाला. त्या तुलनेत राष्ट्रवादीच्या एकहाती नेतृत्वाने निवडणूक गांभीर्याने घेतली आणि भाजपचा ज्या बाबींवर भरोसा होता, त्याच राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्या. राज्यभरातील या स्थितीला खानदेश, उत्तर महाराष्ट्रही अपवाद ठरला नाही. 
2014 च्या तुलनेत भाजप व शिवसेनेलाही यंदा काही जागांचा फटका उत्तर महाराष्ट्रात बसला. विदर्भातही भाजपच्या जागा कमी झाल्यात.. त्यांचे आकडे गंभीर नसले तरी आता सत्ता स्थापनेसाठी एकेक जागा किती महत्त्वाची आहे, याची जाणीव भाजप नेतृत्वाला झाली असावी, असे समजायला हरकत नाही. कारण, भाजपतील ठराविक श्रेष्ठींच्या हेकेखोरपणामुळेच काही जागांवर पक्षाला "पाणी' सोडावे लागले. तर काही जागा अंतर्गत कलहातूनच जाणीवपूर्वक समर्पित करण्यात आल्या. अर्थात, प्रत्येक मतदारसंघातील यशापयशाची कारणे व पर्यायाने त्याचं विश्‍लेषणही वेगवेगळं असतं. 
उत्तर महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याची जबाबदारी गिरीश महाजनांनी मोठ्या मनाने स्वीकारली. अपयशाचे ते धनी झाले, या दिलदारपणाबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं.. पण, ही जबाबदारी स्वीकारतानाच केवळ महाजनच नाही तर पक्षनेतृत्वानेच ती स्वीकारत त्याचे वास्तवावर आधारित विश्‍लेषण करणं, त्यावर आत्मचिंतन करून, प्राप्त निष्कर्षांवर उपाययोजना आखणं.. ही भविष्यातील रणनीती असली पाहिजे. दुर्दैवाने असा उदारमतवादी विचार पक्षनेतृत्व करेल काय? अपेक्षित यश न मिळणं म्हणजे पराभव नाही, असे मानले तरी अनपेक्षित आकड्यांमुळे भाजपच्या सत्तास्थापनेतील मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे भाजपच्या पदरी पडलेल्या या अनपेक्षित आकड्यांची जबाबदारी कोण स्वीकारणार, मुख्यमंत्री की प्रदेशाध्यक्ष? सध्यातरी या नेतृत्वापैकी कुणी ती स्वीकारायला तयार नाही, असे दिसते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com