पुढील वर्षी सव्वाशे कर्मचाऱ्यांची निवृत्ती, महापालिकेवर रिक्त पदांचा भार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नाशिक : सध्या महापालिकेत रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असताना, पुढील वर्षी त्यात आणखी भर पडणार आहे. पुढील वर्षी जानेवारी ते डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल 125 पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे कामावरचा ताण कमी होण्याऐवजी अधिकच वाढणार आहे. 

नाशिक : सध्या महापालिकेत रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असताना, पुढील वर्षी त्यात आणखी भर पडणार आहे. पुढील वर्षी जानेवारी ते डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल 125 पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे कामावरचा ताण कमी होण्याऐवजी अधिकच वाढणार आहे. 

महापालिका प्रशासनाला सध्या रिक्त पदांची वाढत जाणारी संख्या सतावत आहे. महापालिकेचा महसुली खर्च 35 टक्‍क्‍यांच्या वर असल्याने शासनाने रिक्त पदे भरण्यास लाल कंदील दाखविला आहे. त्यामुळे पदे रिक्त होत असताना त्या जागा भरल्या जात नसल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर दिसून येत आहे. एका कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन टेबलचा भार असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. पालिकेत विभागीय अधिकाऱ्यांचा कार्यभारदेखील अभियंत्यांकडे सोपविण्यात आला आहे.

कामाच्या अतिरिक्त ताणामुळे शारीरिक आजार बळावत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने यापूर्वीच केला आहे. महापालिकेला "ब' दर्जा प्राप्त झाल्याने त्यादृष्टीने रिक्त पदांचा नवीन आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यात दुप्पट म्हणजेच 14 हजार पदे दर्शविण्यात आली आहेत. शासनाने अद्याप नवीन आकृतिबंधाला मंजुरी न दिल्याने आउटसोर्सिंगने कामे करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.

एकीकडे रिक्त पदे वाढत असताना पुढील वर्षी त्यात आणखी भर पडणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये तब्बल 125 कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदे रिक्त होणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, अभियंत्यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त कामाच्या अतिरिक्त ताणामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याने पालिका प्रशासनाच्या अडचणींत अधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news worker vaccancy