पाण्याच्या पुनर्वापरासाठी व्हावे सामूहिक प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नाशिक - पाणी खूप मूल्यवान असून, मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर केल्याने त्यांना जपण्याची व बऱ्याच गोष्टींवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. सांडपाणी प्रक्रिया त्यातीलच महत्त्वाचा भाग आहे. या सांडपाणी प्रक्रियेतून शुद्ध झालेल्या पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करणे आवश्‍यक असल्याचा सूर उमटला. 

नाशिक - पाणी खूप मूल्यवान असून, मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर केल्याने त्यांना जपण्याची व बऱ्याच गोष्टींवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. सांडपाणी प्रक्रिया त्यातीलच महत्त्वाचा भाग आहे. या सांडपाणी प्रक्रियेतून शुद्ध झालेल्या पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करणे आवश्‍यक असल्याचा सूर उमटला. 

इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे जागतिक प्लंबिंग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी सहभाग नोंदविला. त्र्यंबक रोडवरील हॉटेल ग्रीन व्ह्यूमध्ये झालेल्या चर्चासत्रात महापालिकेचे कार्यकारी अभियंता (पर्यावरण) नितीन वंजारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आर. यू. पाटील, बिल्डर्स असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष गोपाल अटल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष सुनील कोतवाल, ग्रीन ऍक्‍ट एनव्हिरॉन इंजिनिअरिंग प्रा. लि.चे संचालक विजय घोलप व इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे उपस्थित होते. 

लोकसंख्यावाढीमुळे जुन्या काळातील सेप्टिक टॅंक कालबाह्य झाले असून, मोठी गृहसंकुले, उद्योग, रुग्णालयांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे नियमानेही बंधनकारक आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी मोठी रक्कम व नंतर त्याच्या देखाभालीसाठीही बराच खर्च आहे. मोठ्या गृहप्रकल्पात बांधकाम व्यावसायिकाकडून पूर्णत्वानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी तेथे राहणाऱ्या नागरिकांवर येते. त्यामुळे काही प्रमाणात अशा प्रकल्पांना घरपट्टीमध्ये सवलत द्यावी, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्‍त केली. 

इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे उपाध्यक्ष प्रदीप आबड यांनी प्रास्ताविक केले. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे म्हणाले, की संघटनेच्या माध्यमातून वर्षभरात तीन कोटी लिटर पाणीबचत केली जाईल. 

विविध स्पर्धांचे विजेते - 
जागतिक प्लंबिंग दिनानिमित्त झालेल्या चित्र रंगवा स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व महिला प्लंबर स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिल्पा कुट्टी, रिया परदेशी, मानव यादव, अथर्व कमान, तनीषा तातेड, सोनाली चौधरी, नीलेश क्षीरसागर, गौरव जाधव, प्रगती काळे, निशा सोनाईकर, रेणुका काकड, विद्या घाटे यांच्यासह राष्ट्रीयविजेते प्रगती काळे, प्राची कुलकर्णी, वरिष्ठ प्लंबर गुलाब वाडकर यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्लंबर, आर्किटेक्‍ट, वास्तुविशारद, अभियंते व विद्यार्थी उपस्थित होते. 

Web Title: marathi news world plumbing day nashik