मुक्‍त विद्यापीठातर्फे "श्रमसेवा', "रुक्‍मिणी', "विशाखा' पुरस्कारांचे वितरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नाशिकः मराठी भाषेच्या अस्तित्वावर सध्या चर्चा होऊ लागली आहे. पण आज मराठी भाषा जगभरात गर्वाने बोलली जात आहे, हे विसरायला नको. मराठी भाषेविषयीचे दैन्य नव्हे, तर मराठी भाषेचे वैभव सांगण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. त्यासाठीच आजचा दिवस आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले. 

नाशिकः मराठी भाषेच्या अस्तित्वावर सध्या चर्चा होऊ लागली आहे. पण आज मराठी भाषा जगभरात गर्वाने बोलली जात आहे, हे विसरायला नको. मराठी भाषेविषयीचे दैन्य नव्हे, तर मराठी भाषेचे वैभव सांगण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. त्यासाठीच आजचा दिवस आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले. 
मराठी राजभाषा दिन, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीचे औचित्य साधून नंदनवन लॉन्सच्या शगून सभागृहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे मंगळवारी (ता. 27) पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्या वेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी होते. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. विजया पाटील यांच्यासह पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. पाठक म्हणाले, की स्मार्टफोनने आजचे जगणे अस्वस्थ केले आहे. पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या या स्मार्टफोनद्वारेही मराठी भाषेचा प्रसार करणे आवश्‍यक आहे. कविवर्य कुसुमाग्रजांचा दाखला देताना मराठीचा स्वर कठोर व चांगल्या पद्धतीने प्रत्येकापर्यंत पोचवायला हवा, असे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन म्हणाले, की मातृभाषेत बोलण्याचा आनंद वेगळाच आहे. भारतीय भाषांमध्ये संपन्नता असून, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान बाळगायला पाहिजे. 

पाटील, गुडिलू, शिंदे, कांगणे, बोर्डे-खडसे यांचा गौरव 
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नाशिकच्या सुनीता पाटील यांचा "श्रमसेवा पुरस्कार 2016'ने (21 हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र), मुंबईच्या दुर्गा मल्लू गुडिलू यांना "रुक्‍मिणी पुरस्कार 2016'ने (21 हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र) गौरविण्यात आले. "विशाखा काव्य पुरस्कार 2017'अंतर्गत प्रथम पुरस्कार मुंबईच्या सुशीलकुमार शिंदे यांना, द्वितीय पुरस्कार सिन्नर (जि. नाशिक)च्या रवींद्र कांगणे, तृतीय पुरस्कार सांगलीच्या सुनीता बोर्डे-खडसे यांना प्रदान केला. अनुक्रमे 21 हजार, 15 हजार व दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

"मराठी अमुची मायबोली'तून मराठीचा मांडला प्रवास 
रूद्र थिएटर्स व मुंबईच्या नकाशे एन्टरटेन्मेंटनिर्मित "मराठी अमुची मायबोली' कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. संत ज्ञानेश्‍वरांपासून तर आजवर मराठी भाषेचा प्रवास या कार्यक्रमातून गायन, नृत्य, नाट्यपद, काव्यवाचन, पोवाडा, दृकश्राव्य चित्रफीत अशा विविध माध्यमांतून मांडला. पन्नास कलाकारांचा सहभाग असलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीवंदनेने झाली. संत ज्ञानेश्‍वरांचे श्‍लोक व त्यानंतर विविध कलांच्या सादरीकरणाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला. संकल्पना व दिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे, तर लेखन विवेक आपटे यांनी केले. अतुल परचुरे, मंदार खराडे यांनी निवेदन केले. अजित परभ, अमोल बावडेकर, सुचित्रा भागवत, माधुरी करमरकर यांनी गायन केले. नृत्यदिग्दर्शन मिनल भिके, ग्रिश्‍मा केरिमणी यांचे होते. संगीत संयोजनाची धुरा अजित परब यांनी सांभाळली. 

Web Title: marathi news ycmou award