पाटील,गुडीलू,शिंदे,कांगणे,बोर्डे यांना मुक्तचे पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पाटील,गुडीलू,शिंदे,कांगणे,बोर्डे यांना मुक्तचे पुरस्कार 

पाटील,गुडीलू,शिंदे,कांगणे,बोर्डे यांना मुक्तचे पुरस्कार 

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. विद्यापीठाच्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी शुक्रवारी (ता. 23) नाशिक येथे केली. यात नाशिकच्या सुनीता पाटील यांना श्रमसेवा, मुंबईच्या दुर्गा गुडीलू यांना रुक्‍मिणी पुरस्कार, तर ठाण्याचे सुशीलकुमार शिंदे, सिन्नर (जि. नाशिक) येथील कवी रवींद्र कांगणे आणि सांगली येथील कवयित्री 
डॉ. सुनीता बोर्डे-खडसे विशाखा काव्य पुरस्काराचे मानकरी ठरले. 
आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाऱ्या महिलेला किंवा महिलांच्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा "श्रमसेवा पुरस्कार' नाशिक येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या सुनीता पाटील यांना जाहीर झाला. 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

रुक्‍मिणी पुरस्कार वैदू या अतिशय मागासलेल्या समाजासाठी काम करणाऱ्या श्रीमती दुर्गा मल्लू गुडीलू यांना जाहीर झाला आहे. त्यांनी समाजातील 112 शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले. समाजातील महिलांचे 58 बचतगट स्थापन करून, त्यांना प्रौढ शिक्षणवर्गात बसवले. आज अशा प्रकारच्या 84 महिला मुंबईतील हॉटेलना रोज तीन हजार पोळ्या बनवून देण्याचे काम करतात. टिफिन सर्व्हिसबरोबरच अनेक शाळांना नाश्‍ता बनवून देण्याचे काम करताहेत. 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

कवी कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यातर्फे दिले जाणारे विशाखा काव्य पुरस्कारही जाहीर केले. 21 हजारांचा प्रथम पुरस्कार वर्तकनगर (ठाणे) येथील नवोदित कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या "आत्महत्या करायचं म्हणतंय' काव्यसंग्रहास, पंधरा हजारांचा द्वितीय पुरस्कार "येठण' या सिन्नर (जि. नाशिक) येथील कवी रवींद्र कांगणे यांच्या काव्यसंग्रहाला, तर दहा हजारांचा तृतीय पुरस्कार सांगलीतील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांच्या "अस्तित्वाचा अजिंठा कोरतांना' या काव्यसंग्रहास दिला जाईल. 

मंगळवारी पुरस्कारांचे वितरण 

पुरस्कार वितरण समारंभ येत्या मंगळवारी (ता. 27) सायंकाळी पाचला गंगापूर रोडवरील मते नर्सरी येथील शगुन हॉलमध्ये होईल. या वेळी कवी किशोर पाठक यांची प्रमुख उपस्थिती असेल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी असतील. उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल शिक्षणसेवा केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. विजया पाटील, जनसंपर्क विभागाचे प्रमुख संतोष साबळे यांनी सुत्रसंचालन केले.
 

Web Title: marathi news ycmou award