...त्याच्या खोडकरपणानेच वाचला धाकटया भावाचा जीव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

विराणे : अंगणात खेळत असलेला लहानगा पाण्याने भरलेल्या पाच फूट खोल खड्‌ड्‌यात पडल्याचे लक्षात येताच आरडाओरडा करूनही कुणीही प्रतिसाद देत नसल्याचे बघत क्षणाचा विलंब न लावता गावात अडदांड म्हणून परिचित असलेल्या सहावर्षीय बालकाने आपल्या लहान भावाचे प्राण वाचविल्याची घटना नुकतीच सातमाने (ता. मालेगाव) येथे घडली. 

विराणे : अंगणात खेळत असलेला लहानगा पाण्याने भरलेल्या पाच फूट खोल खड्‌ड्‌यात पडल्याचे लक्षात येताच आरडाओरडा करूनही कुणीही प्रतिसाद देत नसल्याचे बघत क्षणाचा विलंब न लावता गावात अडदांड म्हणून परिचित असलेल्या सहावर्षीय बालकाने आपल्या लहान भावाचे प्राण वाचविल्याची घटना नुकतीच सातमाने (ता. मालेगाव) येथे घडली. 

यश मूळचा काळगाव (जि. धुळे) येथील; परंतु शिक्षणासाठी सातमाने येथील मामा अविनाश देवरे यांच्याकडे राहत आहे. दिवाळीसाठी यशची आई जयश्री लहान मुलगा ऋषीसह माहेरी आली होती. सुटी असल्याने यशचा नित्यनेम म्हणजे खेळणे. अंगणात खेळत असताना यशचा लहान भाऊ ऋषीदेखील अंगणात खेळायला लागला. खेळताना पाण्यासाठी घेतलेल्या नळाच्या खड्ड्यात ऋषी पडला. पाच फूट खोलीचा खड्डा पाण्याने भरलेला होता. यशच्या लक्षात येताच यशने आरडाओरडा केला. मामा, आजी शेतात कामाला, तर आई घरातील कामे आवरत होती. मोठ्याने आवाज देऊनदेखील आई येत नसल्याने यशने धाडस दाखवत खड्ड्यात उडी मारली. पाण्यात बुडालेल्या भावाला उचलून घेत बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता.

आणि सतर्कता दाखवली...

पाण्याच्या आवाजाने आई धावत आली. आईने दोन्ही मुलांना खड्ड्याच्या वर ओढले. तोपर्यंत नाकातोंडातून पाणी गेल्याने ऋषी बेशुद्ध झाला होता. त्यास त्वरित डॉ. दीपक जाधव यांच्याकडे नेले. प्राथमिक उपचारानंतर मालेगाव येथील रुग्णालयात ऋषीला दाखल करण्यात आले. काही तासांनंतर ऋषी शुद्धीवर आला. 

सहा वर्षीय यशचा पराक्रम

यश संपूर्ण गावात खोड्या करणारा अडदांड मुलगा म्हणून परिचित आहे. त्याच्या आगाऊपणाने अंगी धाडस. हेच धाडस त्याच्या लहान भावाला जीवदान देऊन गेले. या घटनेची चर्चा गावात झाली. सुटीनंतर शाळा सुरू होताच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बागूल, वर्गशिक्षिका नंदिनी बच्छाव व सहकारी शिक्षकांनी यशचा सत्कार करत त्याच्या धाडसाबद्दल बक्षीस देत कौतुक केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yesh performance