#BATTLE FOR NASHIK-कोकाटेंवर शस्त्रक्रिया करा, संजय राऊतांचे महाजनांना आवाहन 

residentional photo
residentional photo


नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून बंडखोरी करणारे भारतीय जनता पक्षाचे ऍड. माणिकराव कोकाटे यांची काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करावी लागेल. त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घ्यावी लागेल, असा सूचनावजा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला. शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळेच जिल्हाप्रमुख विजय करंजकर व बाजार समितीचे शिवाजी चुंभळे यांनी माघार घेत त्याग केल्याचे सांगत राऊत यांनी शिवसेनेच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. 

हनुमानवाडी येथील श्रद्धा लॉन्सवर भाजप- शिवसेना महायुतीच्या बूथप्रमुखांचा मेळाव्यात ते शनिवारी (ता. 5) बोलत होते. राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान देतानाच जाहीर सभांमधून तुरुंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या राहुल यांनी रॉबर्ट वद्रा जामिनावर बाहेर आहे, याची काळजी घेण्याची सांगितले. परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्यावर सहा हजार कोटींचे कर्ज असताना 11 हजार कोटींची मालमत्ता सील केली, तर नीरव मोदीला इंग्लंडच्या तुरुंगात डांबले आहे, हे पंतप्रधान मोदींचे कर्तृत्व आहे. ही बाब राहुल गांधी यांनी समजून घेतली पाहिजे.

हिंदू धर्माचे वाचन करणाऱ्या राहुल यांनी आधी त्यांचा खरा धर्म कोणता, हे सांगावे, त्यानंतर मोदींवर टीका करावी. 50 वर्षांच्या सत्ताकाळात जातींमध्ये भांडणे लावली आहेत, अशांना धडा शिकविण्याची परवानगी हिंदू धर्मात असल्याने त्यांनी धर्मग्रंथाचे काळजीपूर्वक वाचन करण्याचा सल्ला दिला. देशाला रक्षण करणारे मोदी यांचे नेतृत्व मिळाले. परंतु त्यांना हटविण्याची तयारी विरोधकांकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, की नाशिकमध्ये युतीची ताकद असली तरी गाफील राहू नका. राजकीय भवितव्य समजल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची युतीत प्रवेश करण्यासाठी रीघ लागली आहे. निवडणुकीनिमित्ताने कितीही पैसा वाटला, जाहिरातबाजी करत कूटनीतीचा अवलंब केला तरी भुजबळ यांना नाशिककर मत देणार नाहीत. राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, विजय करंजकर यांची भाषणे झाली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सुरेश पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. 


मायावती कशा दिसतील? 
लग्न केले नाही, हा देशासाठी मोठा त्याग केल्याचे मायावती सांगतात. परंतु त्यांनी लग्न केले असते तर देश मोठ्या संकटातून वाचला असता अशी टीका करताना राऊत यांनी मायावती पंतप्रधान झाल्या असत्या, तर कशा दिसल्या असत्या असा सवाल केला. तुरुंगातून पाहुणचार झोडून आलेले छगन भुजबळ यांचा आसारामबापू असा उल्लेख करत खिल्ली उडविली. समीर भुजबळ यांची उमेदवारी नाशिककर सोसणार नसल्याची टीका त्यांनी केली. देशाला मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी महायुतीचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले. तर नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावा म्हणून अनेकदा प्रयत्न केले. सत्ता आल्यास पहिल्याच अधिवेशनात भारतरत्न पुरस्काराने सावरकरांचा गौरव होईल, यात शंका नसल्याचेही खासदार राऊत यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com