#GROUND REPORT प्रचारात हिंदू-मुस्लिम मुद्दे सोडून  शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर केव्हा बोलणार?

live
live


"जीएसटी' वसूल करतो व्यापारी, भरतो शेतकरी. त्यावर सरकारची तिजोरी फुगते. व्यापाऱ्याचा खिसा भरतो. जीएसटी भरून भरून शेतकरी मरतो. याच्यावर एकही बातमी का येत नाही? मंत्री अन्‌ नेते निवडणुकीतदेखील हिंदू, मुस्लिम, भारत आणि पाकिस्तानवरच का बोलतात, याचे उत्तर देणारा विक्रम शोधता शोधता चक्रम व्हायची वेळ आली आहे. ही आहे शनिवारी (ता. 6) सकाळी भालूर (ता. नांदगाव) येथील पारावर रंगलेली शेतकऱ्यांची चर्चा. 
... 
      ग्रामीण भागात निवडणुकीची हवा जोर धरू लागली आहे. बाकीचे वातावरण उन्हाने तापलेले. या उन्हात पारावर जमले अन्‌ हातात वर्तमानपत्र असेल, तर दुसरा विषय सुचणार तरी कसा? भालूरच्या परशराम शिंदे या द्राक्ष बागायतदाराने अडीच एकर बाग तोडली. त्यावर गरमागरम चर्चा सुर होती. बाग जोडणारे शिंदे म्हणत होते, "फवारणीला कीटकनाशक आणले. औजारे आणली, पाण्यासाठी टॅंकरला डिझेल. काहीही घेतले की गब्बरसिंग टॅक्‍स शेतकरी भरतो. तो सरकारची तिजोरी भरतो. त्याचा परतावा व्यापारी घेतो. त्यामुळे व्यापाऱ्याचा खिसा फुगतो. मी द्राक्षे विकायला गेलो की भाव नसतो. कंगाल झाल्याने आम्ही शेतकरी मरतो. ही आमच्या दुःखाची कविता आहे.

  शेतकऱ्यांवर टॅक्‍स लावता तरी हे शहरातील लोक मजा करतात. यावर निवडणुकीत चर्चा व्हायला पाहिजे.' आधी आपल्या घरच्या पोरांना, शहरातल्या नातेवाइकांना कळेल असे केले पाहिजे. पण यावर कोणीच चर्चाही करीत नाही. हे सरकार निवडून तरी कसे येते? त्याला मतं कोण देतं? तास-दोन तास ती चर्चा रंगली. 
पारावरच्या या चर्चेत परशराम शिंदेंच्या प्रश्‍नांना सगळ्यांचा पाठिंबा होता. शांताराम कडलग, अशोक निकम, आप्पा मडके, दिलीप निकम, भास्कर लहिरे, यादव निकम, देवीदास निकम, राजेंद्र शिंदे, भाऊसाहेब आहेर, तुकाराम निकम यांनीही त्यात भाग घेत भर टाकली. सध्या शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.

    दुष्काळामुळे सगळेच होरपळून गेले आहेत. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर मिळणे मुश्‍कील असते. हे प्रश्‍न सोडण्याची ज्याची जबाबदारी ते नेते, आमदार, खासदार लोकांना प्रतिप्रश्‍न करतात. नेता मोठा की अधिकारी या वादात लोकांची, शेतकरी, गावाची अडचण आहे. भालूर गावात पाझर तलाव आहे. मात्र, त्याचे पाणी आटले. भागातील पीक यंदा स्वप्न आहे. मात्र, याबाबत चर्चा कुठे करायची? कारण सगळेच संकटात आहेत. सध्या निवडणुकीची हवा आहे. त्यामुळे राजकीय मंडळी शेतकऱ्यांकडे येतात. सरकार मात्र आंधळे, बहिरे झाले आहे. गरिबांचा विचार करणारा कोणीतरी यावा. प्रश्‍न सोडवावेत, ही माफक अपेक्षा शेतकरीवर्ग करताना दिसतो. मात्र, निवडणुकीत मंत्री बोलतात ते हिंदू, मुस्लिम, सर्जिकल स्ट्राइक, भारत आणि पाकिस्तान या विषयांवर. खरे प्रश्‍न केव्हा चर्चेत येतील?, असे सध्याचे चित्र नाही. मतदार मात्र सावध आहेत. मतदानाचा विषय काढला तर गप्प होतो. "यंदासारखे काही नाही' असे सूचक काहीतरी शेतकरी, महिला बोलून जातात. दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त. शेतकरी त्रस्त असल्याने निवडणुकीत पुढारी संत्रस्त होतील, अशी चिन्हे आहेत. 
................... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com