भाषिक संस्कारामुळे स्त्री आणि पुरुष अशी सामाजिक विभागणी : डॉ. चंद्रकांत पाटील

live
live

 
सटाणा : भाषा ही संस्कृतीच्या अनेक अंगांना अभिव्यक्त करण्याचे माध्यम असून भाषेमुळेच माणसाचे माणूसपण जन्माला येते आणि भाषेमुळेच माणूस सामाजिक होतो. भाषाच लिंगभेदावर आधारित समाजरचना जन्माला घालते. म्हणूनच या भाषिक संस्कारामुळे स्त्री आणि पुरुष अशी सामाजिक विभागणी झाली आहे. असे प्रतिपादन प्रख्यात कवी, अनुवादक व समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील यांनी आज रविवार (ता.२९) रोजी येथे केले. 

येथील ‘साहित्यायन’ या संस्थेतर्फे देवमामलेदार सभागृहात आयोजित २७ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून समीक्षक डॉ.पाटील बोलत होते. प्रख्यात समीक्षक प्रा.अविनाश सप्रे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कथाकार व कादंबरीकार डॉ. भारत सासणे, राज्य मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष व साहित्यायनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, सचिव बा. जि. पगार, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड,  प्रा.शं.क.कापडणीस आदि उपस्थित होते. 
डॉ.पाटील म्हणाले, भारतीय समाजच पुरुषप्रधान व्यवस्थेने बनला आहे. म्हणून स्त्री आणि पुरुषाचे भाषेशी वेगवेगळे नाते नसते. स्त्रियांच्या भाषेवर प्रचंड सामाजिक दबाव असतो. हा दबावच तिच्या असतेपणावर आघात करतो. याच विद्रोहातुन स्त्रीवादी साहित्य जन्माला आले. स्त्रीवाद स्त्री मुक्तीसाठी, स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक असून पुरुषी पर्यावरणाने स्त्री समानतेवर लादलेले साहित्य असते. मराठीने भारतीय साहित्याला दिलेले महत्वपुर्ण योगदान म्हणून दलित आणि आदिवासी साहित्याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. मानवी जीवनातील अज्ञान शोधणे हे साहित्याचे महत्वाचे उद्दिष्ट असुन वाचकांमध्ये सखोल जाणीव निर्माण करणे यासारखी जबाबदारी देखील साहित्याला पार पाडावी लागत असल्याची जाणीव ठेवूनच सकस साहित्य निर्मितीची साहित्यीकांकडून अपेक्षा असते, असेही डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले.

उद्घाटक अविनाश सप्रे म्हणाले, साहित्याचे वाचन करित असतांना साहित्य नवनवीन दृष्टीकोन देत असतात, लक्षात न आलेल्या बाबीं साहित्य लक्षात आणून देत असल्याने साहित्याकडे सकारात्मक नजरेने बघणे महत्वाचे आहे. प्रबोधनपर्वातून पुढे आलेल्या आणि रुजत असलेल्या उदारमतवाद, स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवता या मूल्यांचा संकोच करणारा आहे. चळवळी थंडावल्या आहेत. विचारांचा अंत झाला आहे. माणसाचे वस्तूकरण करणाऱ्या बाजारीकेंद्री अर्थकारणाचे प्राबल्य वाढते आहे. असे अस्वस्थ आणि सैरभैर वर्तमान आजच्या साहित्यनिर्मिती पुढचे सर्वात मोठे आव्हान आहे, असेही प्रा.सप्रे यांनी स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.धोंडगे यांनी प्रस्ताविकात साहित्यायन संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. 

यावेळी साहित्यायन संस्थेतर्फे ज्येष्ठ पत्रकार व बागलाण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर खमताणे (ता.बागलाण) येथील (स्व.) धर्माजी तानाजी वाचनालय तसेच पेंटर डी.मोरे यांचा सत्कार करण्यात आला. साहित्यायनच्या सदस्या व लेखिका सीमा सोनवणे यांनी संपादित केलेल्या ‘साहित्यायनी’ या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात ‘मराठी कथा समकालीन वास्तव कलात्मकपणे चित्रित करते काय ?’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भारत सासणे होते. तर डॉ.राजेंद्र मालोसे, डॉ. नितीन रिंढे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यानंतर डॉ.शोभा बडवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलनात जेष्ठ कवी कमलाकर देसले, रविराज सोनार, नितीन माधव, रविंद्र मालुंजकर, विजयकुमार मिठे, शैलेश चव्हाण, संजय बोरूडे, सीमा सोनवणे, राज शेळके, वाल्मिक सोनवणे, बाळासाहेब हिरे आदि राज्यभरातील नामवंत कवींनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या. 

संमेलनास प्राचार्य हितेंद्र आहेर, प्रा.एकनाथ पगार, प्रल्हाद पाटील, संस्थेचे खजिनदार रविंद्र भदाणे, समन्वयक डॉ.व्ही.डी.पाटील, शुभदा माजगावकर, अॅड.सोमदत्त मुंजवाडकर, किरण दशमुखे, बाबूलाल मोरे, नगरसेवक महेश देवरे, सीमा सोनवणे, अश्विनी कुलकर्णी, ललित खैरणार, पांडुरंग सावळा, साहेबराव बच्छाव, बापू बागूल, अॅड.सतीश चिंधडे, सुरेश बागड, बी.एस.देवरे, एस.टी.भामरे, आर.डी.खैरणार, काशीनाथ डोईफोडे, रमेश सोनवणे, नगरसेवक दिनकर सोनवणे, एस.डी.देवरे, वैभव गांगुर्डे, जयश्री गुंजाळ, अॅड.सरोज चंद्रात्रे, एन.टी.मंजुळे, सोपान खैरणार, गजानन जोशी आदींसह साहित्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. 

दरम्यान, आज सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून टिळकरोड वरील मुख्य बाजारपेठेतून ग्रंथदिंडी काढण्यात आली. विविधरंगी मऱ्हाटमोळ्या पद्धतीत पारंपारिक साड्यांचा पेहराव केलेल्या विद्यार्थिनी व लेझीम खेळणारी मुले, तुताऱ्या हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते. श्रीमती ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सचिव बा.जि.पगार यांनी आभार मान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com