कचऱ्याच्या प्रश्‍नावर मराठी विद्यार्थ्यांचे अमेरिकेत संशोधन

प्रशांत कोतकर
रविवार, 23 एप्रिल 2017

संशोधनात मराठी बाणा
ओबर्न विद्यापीठ हे या विषयातील संशोधनात अग्रेसर असलेल्या विद्यापीठांपैकी एक असून, भारतीय विद्यार्थ्यांचा या विषयातील सहभाग लक्षणीय आहे. कचऱ्यापासून जैविक तेल बनवण्यातील संशोधनात मुंबईच्या विवेक पाटील, तर या जैविक तेलापासून पर्यावरणाला पूरक असे प्लास्टिक बनवण्यात नाशिकच्या मेहुल बर्डे याचा सहभाग आहे.

नाशिक - अमेरिकेतील ओबर्न विद्यापीठात (Auburn University, USA) भरलेल्या आरोग्य, अन्न, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान व संसाधने अशा अनेक विषयांच्या संशोधन प्रदर्शनात दोन विशेष संशोधनातील कामांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्या दोन्ही विषयांचे संशोधन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत आणि विविध उद्देशाने चाललेले असले, तरी त्या दोघांत एक संबंध होता.

पहिला म्हणजे, घनकचऱ्यापासून खनिज तेलाची निर्मिती.  खरे म्हणजे हे तेल जमिनीतून मिळणाऱ्या खनिज तेलासारखेच असते, पण ते उत्खननातून न मिळवता कचऱ्याचे विघटन करून बनविले जाते ते "जैविक तेल' (खनिज तेल). दुसरा विषय म्हणजे, या जैविक तेलापासून प्लास्टिकची निर्मिती करणे. विशेष म्हणजे, या दोन्ही विषयांवर संशोधन करणारे संशोधक हे मराठी तरुण असून, त्यातील एक म्हणजे, नाशिकचा मेहुल बर्डे, तर दुसरा मुंबईचा विवेक पाटील.

या संदर्भात संशोधकांनी "सकाळ'ला सांगितले, की या दोन्ही संशोधनांमधला दुवा होता तो रोजच्या वापरातले प्लास्टिक, जे भूगर्भातल्या खनिज तेलापासून येते. त्याच्या उत्खननापासून रासायनिक प्रक्रियेपर्यंत अनेक प्रकारे प्रदूषण होते. याबरोबरच प्लास्टिक हे विघटनशील नसल्यामुळे ते पुन्हा जमिनीत जात नाही आणि ते अनेक शतके डम्पिंग ग्राउंडमध्येच पडलेले राहू शकते. आजच्या शहरी भागात वाढत चाललेल्या कचऱ्याच्या प्रश्‍नाला प्लास्टिक हे मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. पण त्याच वेळी प्लास्टिकचा वापर करणे टाळताही येत नाही. अनेक दशके प्लास्टिक न वापरण्याबद्दल लोकांना सांगितले जाते, पण आजच्या जीवनशैलीत कितीही प्रयत्न केला तरी थोडे तरी प्लास्टिक दिवसाकाठी वापरावेच लागते. मग भूगर्भातून सतत जमिनीवर आणल्या जाणाऱ्या या कचऱ्याला थांबवणार तरी कसे? तेव्हा विचार करा, आपण खनिज तेलाचा वापर न करताच प्लास्टिक बनवू शकलो तर? म्हणजे जो कचरा आधीपासून जमिनीवर आहे, तोच जमिनीवर राहील आणि त्यात वाढ होणार नाही. जैविक तेलापासून प्लास्टिक बनवणे आता जास्त आशादायी दिसू लागते.

आपण वापरलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे जैविक तेलात रूपांतर करणे आणि त्याच तेलाचा वापर करून प्लास्टिक बनवणे, ही एक बंद साखळी आहे. त्यात कधीच बाहेरचा कचरा आता येत नाही किंवा त्यातून काही कचरा बाहेर पडत नाही. वैज्ञानिक भाषेत याला "Closed loop System' असे म्हणतात. पृथ्वीवर भू आणि जलप्रदूषण करणाऱ्या कचऱ्यावर हा एक निर्णायक उपाय ठरू शकतो. कचऱ्याचे तेल, तेलाचे इंधन किंवा प्लास्टिक आणि त्या प्लास्टिकचा पुन्हा कचरा आणि त्याचे पुन्हा तेल. पारंपरिक पद्धतीने ज्याप्रकारे प्लास्टिकची निर्मिती केली जाते त्याप्रकारे तयार होणाऱ्या वस्तू या एकाच दिशेने जातात आणि शेवटी कचऱ्यात रूपांतरित होतात. डम्पिंग ग्राउंडवर दिसणारे प्लास्टिक हे याच प्रक्रियेतून आलेले असते.
याउलट कचऱ्यापासून बनवलेले तेल, योग्य प्रक्रियेनंतर इंधन आणि प्लास्टिक बनवण्यासाठी वापरता येते. यासाठी लागणारे संशोधन अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक भारतीय विद्यार्थी या संशोधनाला यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

 

Web Title: Marathi student research on garbage in America