निवडणुकीपूर्वी गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावणार ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

निवडणुकीपूर्वी गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावणार ! 

जळगावः महापालिकेचे आर्थिक तसेच सर्व प्रश्‍न गाळे प्रकरणावर अवलंबून आहेत. गाळे प्रकरणावर न्यायालयाने देखील आदेश दिले असल्याने गाळ्यांचा प्रश्‍न आधी हाती घेऊन तो निवडणुकीपूर्वी मार्गी लावणार असल्याची माहिती नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 

महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार चंद्रकांत डांगे यांनी आज स्वीकारला, त्याप्रसंगी ते बोलत होते. महापालिकेत नव्याने कार्यभार स्वीकारलेला असला तरी शहरातील समस्या माहिती करून घेतल्या आहेत. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असून नागरी सुविधा उपलब्ध करून देणेही कठीण झाले आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव असून गाळे लिलावाचा प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय आर्थिक स्थिती सुधारणार नाही. 

तर हुडकोचा प्रश्‍न सुटेल 
मनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम हुडकोला दिलेली आहे. आतापर्यंत 312 कोटी रुपये मनपाने भरले असली तरी हुडकोच्या डिक्री नोटीसप्रमाणे पैसे हे वन टाइम सेटलमेंटने भरावे लागल्यास तेवढा मनपाकडे पैसा पाहिजे. त्यामुळे गाळ्यांचा प्रश्‍न आधी मार्गी लावल्यावर हुडकोच्या कर्जाचा प्रश्‍न सुटेल असे आयुक्तांनी सांगितले. 

25 कोटीतून कामे लवकरच होणार 
मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासकामांसाठी दिलेल्या 25 कोटींपैकी 18 कोटींची कामे मंजूर झाली आहेत. येत्या महासभेत ठराव करून लवकरच कामांना सुरवात केली जाईल. तसेच काही काम सुरू करण्यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येऊ शकतो, असेही ते म्हणाले. 

विभागप्रमुखांची बैठक 
आयुक्त डांगे यांनी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी विभागप्रमुखांची ओळख करून घेत कामकाजाचा आढावा घेतला. त्या-त्या विभागातील कामांचे नियोजन व त्यासंबंधीच्या अहवालाबाबत सूचनाही दिल्या. 

महापौरांनी केले स्वागत 
मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पदभार घेतल्यावर महापौर ललित कोल्हे यांनी त्यांचे दालनात जाऊन स्वागत केले. यावेळी खाविआ गटनेते सुनील महाजन, माजी स्थायी समिती सभापती नितीन बरडे, नगरसेवक श्‍यामकांत सोनवणे, अनंत जोशी आदी उपस्थित होते. 
 
Web Title: margi