अक्षयतृतीयेनिमित्त बाजारपेठ फुलली! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

जळगाव - खानदेशात अक्षयतृतीया सणाला फार महत्त्व आहे. या सणाला नवीन घागर भरून पितरांना आंब्याचा रस, पुरणपोळी, खरबूज आदींचा नैवेद्य दाखविला जातो. यंदा खरबुजाचे दर गतवर्षीप्रमाणेच आहेत, तर घागरींच्या दरात मात्र वाढ झाली आहे. दरम्यान, नागरिकांकडून लहान घागरींना अधिक पसंती मिळत आहे. 

जळगाव - खानदेशात अक्षयतृतीया सणाला फार महत्त्व आहे. या सणाला नवीन घागर भरून पितरांना आंब्याचा रस, पुरणपोळी, खरबूज आदींचा नैवेद्य दाखविला जातो. यंदा खरबुजाचे दर गतवर्षीप्रमाणेच आहेत, तर घागरींच्या दरात मात्र वाढ झाली आहे. दरम्यान, नागरिकांकडून लहान घागरींना अधिक पसंती मिळत आहे. 

खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार व लगतच्या नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबे आज पुणे- मुंबईत व्यवसाय- नोकरीनिमित्त कायमस्वरूपी स्थलांतरित झाली आहेत. कामाच्या व्यापामुळे या कुटुंबांना गावाकडे नेहमी येणे होत नाही, याची हुरहूर मनाला असतेच. या खानदेशवासीयांचा आवडता सण म्हणजे अक्षयतृतीया. हा पितरांचा सण जरी असला, तरी खानदेशात मात्र तो आनंदाने साजरा केला जातो. यासाठी शहरात आज घागरी, खरबूज, आंबे खरेदीला वेग आला असून, बाजारात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघावयास मिळाली. 

"आखाजी'पासून आंब्यांची सुरवात 
"आखाजी'ला नैवेद्य दाखविल्याशिवाय आंबे न खाण्याची परंपरा आहे. त्यामुळे या सणाआधी आंबे खरेदी कमी प्रमाणात होती. "आखाजी'चा सण तोंडावर येऊन ठेपल्याने आज सायंकाळी बाजारात आंबे खरेदीला मात्र वेग आलेला दिसून आला. यात केशर व लंगडा या आंब्यांच्या प्रकारास सर्वाधिक मागणी आहे. 

लहान घागरींना पसंती 
यंदा घागरींचे दर गतवर्षीपेक्षा अधिक असल्याने नागरिकांनी लहान घागरींना पसंती दर्शविली आहे. यात लहान घागरी 30 ते 40 रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत, तर मोठ्या घागरी 60 ते 70 रुपयांना मिळत आहेत. 

डांगराचे दर स्थिर 
"आखाजी'चा सण म्हटला, की त्यात आंब्याप्रमाणेच डांगराचेदेखील महत्त्व असते. यंदा खानदेशात डांगराचे उत्पादन अधिक झाले असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत. 20 ते 25 रुपये किलोप्रमाणे ते विक्रीस उपलब्ध आहेत. 

वाहन खरेदीवर "ऑफर्स'! 
काही दिवसांपूर्वी "बीएस- 3' वाहनबंदीचा निर्णय जाहीर झाला. यानंतर दोन दिवसांत शहरात हजारो नागरिकांनी कमी किमतीत "बीएस- 3'च्या वाहनांची खरेदी केली. या बाबीला महिना उलटत नाही, तोच आता अक्षयतृतीयेच्या "ऑफर्स' पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत. मात्र, यावेळी वाहन खरेदीला नागरिकांनी नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे वाहन बुकिंगला अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली.

Web Title: The market is full