लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी वधू दागिन्यांसह फरारी

Marriage
Marriage

घोटी - बेलगाव (ता. इगतपुरी) येथील युवकास दलालांच्या माध्यमातून लग्न लावून घेणे महागात पडले आहे. सातारा जिल्ह्यातील दलालांनी लाखो रुपयांना चंदन लावत लग्नानंतर वधूने धूम ठोकल्याने घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलगाव तऱ्हाळे येथील लक्ष्मण मोरे (वय २६) यास शेरसिरंबे (कऱ्हाड, जिल्हा सातारा) येथील रेखा पाटील, सदा पाटील, वर्षा ऊर्फ चंदा पाटील यांनी इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे मुलगी असल्याचे सांगत मुलगी पाहाण्यासाठी बोलावून घेतले. मुलगी ज्योती पाटील पसंत पडल्याने लक्ष्मण याने मध्यस्थीच्या हातावर दीड लाख रुपये देऊन २५ एप्रिल २०१८ ला विवाह उरकून गावी परतला. गावी परतल्यानंतर पुन्हा नातेवाइकांच्या उपस्थितीत लाखो रुपये खर्च करीत धूमधडाक्‍यात लग्न केले. लाख रुपयांचे सोने वधूच्या अंगावर घातले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कपडे धुण्याच्या बहाण्याने ज्योती कपडे व अंगावरील सोने घेऊन संगनमताने मनोज देहाडे (रा. इचलकरंजी) याच्यासोबत पळून गेली. 

शोधाशोध करूनही वधूचा शोध न लागल्याने व मध्यस्थींनीही हात वर केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे कुटुंबीयांनी सात महिन्यांनंतर घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात येऊन पोलिसांनी सातारा येथील पोलिसांच्या मदतीने सापळा रचून रेखा पाटील, सदा पाटील यांच्या मुसक्‍या आवळल्या. पोलिसी खाक्‍या दाखवताच सदा पाटील याने आपले खरे नाव सर्जेराव लोहार असल्याचे सांगत आम्ही संगनमत करून मोरे कुटुंबास फसविल्याचे कबूल केले. वधू ज्योती पाटील व मनोज देहाडे फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे. संशयितांवर यापूर्वी सातारा जिल्ह्यात अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून फसविल्याचे गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com