लेकीच्या आठवणीसाठी झाड माहेरी वाढते!

बळवंत बोरसे
शनिवार, 19 जानेवारी 2019

नंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस? या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’, हे उत्तर खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या प्रेममय अंतःकरण आणि बुद्धिचातुर्याची साक्षच देते. लेकीची अशीच आठवण कायम राहावी, यासाठी होळ (रनाळे) येथील युवक आणि ग्रामस्थांनी ‘लेकीचं झाड’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे. 

नंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस? या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’, हे उत्तर खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या प्रेममय अंतःकरण आणि बुद्धिचातुर्याची साक्षच देते. लेकीची अशीच आठवण कायम राहावी, यासाठी होळ (रनाळे) येथील युवक आणि ग्रामस्थांनी ‘लेकीचं झाड’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे. 

गावातून लग्न होऊन जाणाऱ्या मुलीच्या हस्ते झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी कुटुंबीयांना दिली जाते. मुलीप्रमाणे झाडाचे संगोपन होणार आणि त्यातून तिची कायम आठवण राहावी, पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, हा उदात्त हेतू त्यामागे आहे. बहिणाबाई आज हयात असत्या तर त्यांनी ग्रामस्थांच्या या उपक्रमावर नक्कीच ‘ लेकीच्या आठवणीसाठी... झाड माहेरी वाढते! या काव्यपंक्ती रचल्या असत्या.

सासरचे लोक कितीही चांगले असले तरी संसारी स्त्रीचे मन हे सतत सासर आणि माहेरच्या हिंदोळ्यावर झुलत असते. काळ बदलला, त्यानुसार आता सोशल मीडियामुळे तर सासर आणि माहेर यात अवघ्या एक सेकंदाचं अंतर राहिलं आहे. तरीही माहेर म्हटले, की तिच्या मनात तेथील आनंदाचे कितीतरी क्षण असे सर्रकन नजरेसमोर येतात. सासुरवाशिणीची ही मनाची व्यथा मांडताना बहिणाबाईंनी मांडलेले माहेराच्या वाटेवरील खाचखळगे अन्‌ रेलबाईचं फाटूकही आता इतिहासजमा झाले; पण माहेरचा गोडवा मात्र कायम आहे. हाच धागा पकडून होळ येथील युवकांनी हा अभिनव उपक्रम राबवीत सासुरवाशिणीला झाडाच्या रूपाने माहेरची आठवण आणि आई-वडिलांना वाढणाऱ्या झाडाच्या रूपाने सतत आपली मुलगी डोळ्यांसमोर राहावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे.

योगेश सतीलाल पाटील, व्यंकट दगा पाटील, भूषण जिजाबराव पाटील, अनिल एकनाथ पाटील या मित्रांनी व ग्रामस्थांनी मिळून ‘लेकीचं झाड’ या उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार गावातून लग्न होऊन जाणाऱ्या मुलीच्या हातून हळदीच्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी झाड लावायचे. हे झाड गावातील मोकळ्या जागेत, घरासमोर, शाळेच्या मैदानात लावण्यात येते. जेणेकरून ते तोडले जाणार नाही व कोणाला त्याची अडचणही होणार नाही. मुलीच्या आठवणीसाठी कळत नकळत त्या झाडाशी एक जिव्हाळ्याचे नाते जुळेल. त्या झाडाचे संगोपन होईल. मुलीच्या संसाराप्रमाणे झाडही बहरत जाईल व पर्यावरणाचेही संवर्धन होईल, असा संदेश होळ येतील या तरुणांनी दिला आहे. या उपक्रमाची सुरवात गावातील सदाशिव पाटील व शानूबाई पाटील यांची कन्या राखी हिच्या विवाहानिमित्त झाली आहे. झाडाभोवती कुंपण करण्यात आले असून, त्यावर राखीचे नाव असलेली पाटीही लावण्यात आली आहे.

Web Title: Marriage Tree Plantation Motivation