विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

नाशिक - बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील आवळ बारीच्या पायथ्याशी एका शेतातील झाडावर बाळू टोपले (वय 30, रा. पठावे दिगर) व आशाबाई चौरे (25, रा. तुंगेल, ता. बागलाण) या प्रेमीयुगुलाने शनिवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. मृत बाळू व आशा दोघेही विवाहित असून, दोघांनाही दोन-दोन अपत्ये आहेत. आपापल्या कुटुंबीयांसह ते गेल्या एक वर्षापासून सोग्रस फाट्याजवळ नैताळे रोडवरील एका पोल्ट्रीफार्मवर मजुरी करीत होते. या कालावधीत त्यांचे प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, आशा चौरे हिचे कुटुंब एक महिन्यापूर्वी पोल्ट्रीचे कामकाज सोडून गावाकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी आलेले होते. बाळू टोपले हा आजीचे निधन झाल्याने गेल्या चार दिवसांपासून पठावे दिगर येथे होता. मागील तीन ते चार दिवसांपासून मृत आशा घरी कुणालाही न सांगता निघून गेल्याने तिचे कुटुंबीय नातेवाइकांकडे शोध घेत होते. चौकशीसाठी ते पठावे दिगर येथे आले असता, तिची ओळख पटली. आत्महत्येच्या कारणाबाबत पोलिस तपास करीत आहेत.
Web Title: Married Lovers Suicide Crime