सटाण्यात विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

सटाणा - धांद्री (ता.बागलाण) येथील बत्तीस वर्षीय विवाहितेने तेरा वर्षांपासून सुरु असलेल्या सासरच्या जाचास कंटाळत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल मंगळवारी (दि.१९) रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पती व सासुसह तिघांना अटक केली आहे.

सटाणा - धांद्री (ता.बागलाण) येथील बत्तीस वर्षीय विवाहितेने तेरा वर्षांपासून सुरु असलेल्या सासरच्या जाचास कंटाळत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल मंगळवारी (दि.१९) रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पती व सासुसह तिघांना अटक केली आहे.

देवळा तालुक्यातील तिसगाव येथील केदार पंडित गायकवाड यांची बहिण सरला हिचा विवाह गेल्या तेरा वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यातील धान्द्री येथील निंबाबाई रामचंद्र मोरे यांचा मुलगा शरद यांच्याशी झाला होता. परंतु, दोघांचा विवाह झाल्यापासूनच खटके उडत होते. हुंडा आणला नाही आणि आवडत नसल्यामुळे सरलाचा सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ सुरु होता. याला कंटाळून सरलाने सोमवारी रात्रीच्या सुमारास दिलीप चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विवाहितेचा मृतदेह खोल पाण्यात आडकल्यामुळे पोलिसांनी लोहणेर येथील पट्टीच्या पोहणाऱ्या जवानांना पाचारण केले. तब्बल आठ तासांच्या शोध मोहिमे नंतर मृतदेह सापडला.

खून झाल्याचा आरोप ....
सरलाचा खून झाल्याचा आरोप करत तिच्या माहेरच्यांनी आज दुपारी सटाणा पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला होता. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी शवविच्छेदन अहवाल बाबत नातेवाईकांशी चर्चा केली. वैद्यकीय अहवालात पाण्यात बुडूनच सरलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विवाहितेचा भाऊ केदार गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शरद रामचंद्र मोरे(पती), निंबाबाई मोरे(सासू), आबाजी मोरे(दीर), मीना भगवान धिवरे(नणंद) राहणार लेंडाने तालुका.मालेगाव, मंगला बलराज जगताप(नणंद) राहणार रवळजी तालुका कळवण, आशा अंबादास पानपाटील(नणंद) राहणार लखमापूर, संगीता रामचंद्र मोरे(नणंद) यांच्याविरुद्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी विवाहितेच्या पती, सासू, दीर या दिघांना अटक केली आहे.  

Web Title: Married woman commits suicide