वशिल्याचे दिवस गेले, आता गुणवत्तेलाच संधी : जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

जळगाव : महाविद्यालयीन जीवन हा करिअरमधला टर्निंग पॉइंट असतो, भविष्य घडविणारा हा काळ.. त्यामुळे याच वयात आपले "गोल' सेट करा. क्षेत्र कोणतेही असो, पूर्वीसारखे वशिल्याचे दिवस गेले. गुणवत्ता दाखवली तरच संधी आहे, म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करा... यश हमखास मिळेल, अशी साद घालत राज्याचे रोहयो तथा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तरुणाईला प्रोत्साहित केले. 

जळगाव : महाविद्यालयीन जीवन हा करिअरमधला टर्निंग पॉइंट असतो, भविष्य घडविणारा हा काळ.. त्यामुळे याच वयात आपले "गोल' सेट करा. क्षेत्र कोणतेही असो, पूर्वीसारखे वशिल्याचे दिवस गेले. गुणवत्ता दाखवली तरच संधी आहे, म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करा... यश हमखास मिळेल, अशी साद घालत राज्याचे रोहयो तथा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तरुणाईला प्रोत्साहित केले. 
"सकाळ-यिन'तर्फे आयोजित समर यूथ समिटअंतर्गत आज (ता.15) विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना "यंग इन्स्पिरेटर ऍवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले, त्याप्रसंगी श्री. रावल बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, रेमन मेगॅसेसे पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा, "यिन' महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी, "सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, युनिट मॅनेजर संजय पागे आदी उपस्थित होते. 

हे पेरणीचे दिवस : रावल 
श्री. रावल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, माजी दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाबद्दल बोलताना नेहमी 2020, 2022चा उल्लेख करतात. हा तरुणांचा देश आहे, असे आपण म्हणतो. पण, ही तरुणाई आपल्या देशाची ताकद आहे की कमजोरी हे ठरवावे लागेल. अधिकारासाठी आंदोलन, मोर्चे काढले जातात, मग माझी जबाबदारी, कर्तव्य काय आहे, त्यासाठी आंदोलन का होत नाहीत? महाविद्यालयीन वय हे खरं आयुष्यात पेरणी करायचं वय आहे. याच वयात तुम्ही कष्ट, परिश्रमाची पेरणी करा, नंतर आयुष्यभर फळंच चाखायची आहेत. कोणतेही क्षेत्र अस्पृश्‍य नाही, अगदी राजकारणातही सर्वकाही वाईट आहे, असं नाही. कधीतरी सकारात्मक, रचनात्मक विचार करा. जगात जे चांगलंय ते आणलं पाहिजे, हे सांगताना त्यांनी बुलेट ट्रेनचे समर्थनही केले. 
 
तत्पूर्वी प्रास्ताविकात तेजस गुजराथी यांनी यंग इन्स्पिरेटर ऍवॉर्ड देण्यामागची भूमिका विशद केली. युवकांच्या सर्वांगीण विकासाचे व्रत घेऊन "यिन'ची वाटचाल सुरू झाली. तरुणाईला प्रोत्साहित करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. तरुणांनी त्यातून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही त्यामागची भावना आहे, असे ते म्हणाले. शेवटी विजय बुवा यांनी आभार मानले. सूत्रसंचालन स्वप्नील जोशी व मोहिनी सोनार यांनी केले. 
 

Web Title: marsthi news jalgaon yin summit jaykumar raval