Dhule News | धुळे पोलिस मुख्यालयात शहीद स्मारक : आमदार फारूक शाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fund

Dhule News | धुळे पोलिस मुख्यालयात शहीद स्मारक : आमदार फारूक शाह

धुळे : येथील पोलिस मुख्यालयात शहीद स्मारक होणार असून, पोलिस वसाहतीत काँक्रिट रस्ते, गटारीसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली. (Martyrs Memorial at Police Headquarters dhule news)

ते म्हणाले, की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पोलिस वसाहत असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोयी आहेत. संपूर्ण वसाहतीच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी अस्तित्वात नाहीत. परिणामी सांडपाणी लगतच्या मैदानात साचते.

त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. पोलिस व परिवारातील सदस्य साथीच्या आजाराचे बळी ठरत आहेत. संपूर्ण वसाहतीमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली असून, नवीन गटारी व रस्ते करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

पोलिस मुख्यालय व कवायत मैदानात शहीद स्मारकाची अवस्था बिकट झाली आहे. शहीद स्मारक नव्याने बांधण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी जागा उपलब्ध करून दिली असून, त्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार शहीद स्मारक, काँक्रिट रस्ते व गटारीसाठी तत्कालीन गृहमंत्र्यांकडे दोन वर्षांपूर्वी सहा कोटींच्या निधीची मागणी केली होती.

याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलिस अधीक्षकांमार्फत पोलिस महासंचालकांकडे पाठविला. त्यानुसार गृह विभागाला प्राप्त अर्थसंकल्पीय निधीतून तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. याकामी लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कामास सुरवात होणार आहे, असे आमदार शाह यांनी सांगितले.