केरळच्या तरुणावर सामूहिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

पोलिसांची टोलवाटोलवी
संबंधित तरुणप्रथम आडगाव पोलिसांत गेल्यावर त्याला रिक्षात कोठून बसला, असे पोलिसांनी विचारताच त्याने भद्रकाली परिसरात रिक्षात बसल्याचे सांगितले. त्याला भद्रकाली पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर संबंधिताने भद्रकाली पोलिस ठाणे गाठत आपल्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. मात्र, गुन्हा तपोवनात घडल्याचे समजताच त्याला भद्रकाली पोलिसांनी आडगाव पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पीडित तरुणाने पुन्हा आडगाव पोलिस ठाणे गाठत संशयितांविरोधात तक्रार दाखल केली.

पंचवटी - लग्नपत्रिका वाटण्यासाठी केरळमधून नाशिकमध्ये आलेल्या ३२ वर्षीय तरुणावर तपोवन परिसरात सामूहिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांत अज्ञात रिक्षाचालक व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अत्याचार झाला नसून केवळ लूटमार झाल्याचे सांगत तसा जबाबही तरुणाने पोलिसांकडे नोंदविल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हा तरुण आडगाव नाका भागातील लॉजवर मुक्कामी थांबला होता. भद्रकाली परिसरातील खाऊगल्ली येथे रात्री जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यावर मध्यरात्री बाराच्या सुमारास तो मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा शोधू लागला. दामोदर थिएटरजवळ थांबलेल्या रिक्षात चार जण बसलेले होते. त्याने संबंधित रिक्षाचालकाला पत्ता सांगून त्या ठिकाणी सोडण्याची विनंती केली. या चार तरुणांसह संबंधित रिक्षाचालक त्या प्रवाशाला घेऊन निघाला. त्याने संबंधित प्रवाशाला ठरलेल्या पत्त्यावर न सोडता रिक्षा तपोवनात नेली. त्या ठिकाणी त्याचे काही साथीदार आधीच मद्यप्राशन करत होते. या सर्वांनी त्याला मारहाण करत बळजबरीने मद्यही पाजले.

त्यानंतर त्याच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. रिक्षाचालक व त्याचे सहकारी त्याला सोडून फरारी झाले. घाबरलेल्या तरुणाने शेजारील मंदिरात जाऊन घडलेला प्रसंग सांगितल्यावर पुजाऱ्याने त्याला अंगावर घालण्यासाठी कपडे दिले. बुधवारी (ता. ५) सकाळी उठल्यावर तरुणाने आडगाव पोलिस ठाणे गाठत घडलेल्या प्रसंगाची पोलिसांना माहिती दिली. 

अत्याचार नसून मारहाण 
तपोवनात या तरुणावर अत्याचार झाला नसून केवळ लूटमार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाने आपल्यावर अत्याचार झाला नसल्याचे सांगितल्याचेही पोलिस म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mass tortures on Kerala youth Crime