"त्या' मास्तरला पाठविले सक्तीच्या रजेवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

जळगाव - नशिराबाद (ता. जळगाव) येथील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण प्रकरणी येथील संबंधित शाळेतील "त्या' विकृत मास्तरला शाळा व्यवस्थापनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. घडल्या प्रकारावर दिलेल्या "मेमो'चा लेखी खुलासा संबंधित शिक्षकाने न दिल्याने त्याला तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जळगाव - नशिराबाद (ता. जळगाव) येथील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण प्रकरणी येथील संबंधित शाळेतील "त्या' विकृत मास्तरला शाळा व्यवस्थापनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. घडल्या प्रकारावर दिलेल्या "मेमो'चा लेखी खुलासा संबंधित शिक्षकाने न दिल्याने त्याला तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जळगाव शहरातील नामवंत शिक्षण संस्थेतील विकृत शिक्षकाकडून 14 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये अश्‍लील क्‍लिप दाखवून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना घडली. घडल्या प्रकाराचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध करताच शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली. नशिराबादच्या ग्रामस्थांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. पदाधिकाऱ्यांनी आम्ही पालकांना कारवाईसाठी "कन्व्हेन्स' करतोय, की तक्रार करा, आम्ही कारवाई करतो, असे उत्तर देत एकप्रकारे घडल्या प्रकाराची खात्री त्यांनीही करून घेतली आहे. प्रश्‍न तक्रारीचा असल्याने पालकांत बदनामी व शैक्षणिक नुकसानीची भीती आजही कायम आहे. गावातील एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याने फोन करून यासंदर्भात विचारणाही केली. शिक्षणक्षेत्रातूनही बरेच फोन येत असून गुन्हा दाखल करून "त्या' विकृत शिक्षकाला अटक व्हावी, हीच मागणी सर्वांकडून होत आहे.

"तो' शिक्षक सक्तीच्या रजेवर
घटनेच्या दिवशी पालक व नातेवाईकांचा संताप पाहता प्राचार्यांसह इतर शिक्षकही भेदरले होते. ओळखीपाळखी काढत या पालकांना शांत केल्यावर कारवाईचे आश्‍वासन तेव्हा दिले गेले. शाळेची कारवाई म्हणजेच "मेमो'रूपी चिठ्‌ठी 9 डिसेंबरला या शिक्षकाच्या हाती देण्यात आला. एक-दोन नव्हे, तर तीन वेळा "मेमो' देऊनही जुमानत नाही म्हणून संस्थेने संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश देत शनिवारपासून (17 डिसेंबर) तो सक्तीच्या रजेवर गेल्याची माहिती समोर आली आहे.

क्रांतिकारक व्हावे पण..!
नशिराबाद येथील अनेकांनी घडल्याप्रकाराबाबत गेल्या तीन दिवसांत "सकाळ' कार्यालयाशी संपर्क करून विचारणा केली. शाळेचे नाव-गावही विचारले. अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याला तर घडल्या प्रकाराबाबत संताप होण्याऐवजी आणि पीडिताला मदत करण्याऐवजी शाळेचे नाव, पीडित विद्यार्थ्यांची नावे आणि त्या विकृत शिक्षकाचे नाव जाणून घेण्यातच अधिक रस होता. बातमीत हे सर्व उल्लेख "सकाळ'ने सामाजिक बांधिलकी आणि बालहक्क कायद्याला अनुसरून जाणीवपूर्वक टाळले, असे खडसावल्यावर तो भानावर आला. "आपण पुढाकार घ्या. "त्या' पालकांनी तक्रार करावी, यासाठी त्यांना प्रबोधन करून या पीडितांना न्याय मिळवून देण्यास राजी करा', असे सांगितल्यावर या महाशयांच्या चढ्या आवाजातील शब्द घशात घोंगावून शांत झाले व तोंडभरून वृत्ताचे कौतुक केले. मात्र, पुढे क्रांतिकारकांचा जन्म व्हावा, पण तो शेजारच्या घरात म्हणून हे महाशय शांत झाले.

Web Title: master sent on compulsory leave