महापौर म्हणतात, आता माझंही ठरलंय..! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

लोकसभा व पोटनिवडणुकीनिमित्त तीन महिन्यांपासून आचारसंहिता लागू असल्याने कायम तहकूब होणाऱ्या महासभेला यावे की नाही असा जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना महापौर रंजना भानसी यांनी आव्हान दिले आहे.

नाशिक -  लोकसभा व पोटनिवडणुकीनिमित्त तीन महिन्यांपासून आचारसंहिता लागू असल्याने कायम तहकूब होणाऱ्या महासभेला यावे की नाही असा जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना महापौर रंजना भानसी यांनी आव्हान दिले आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्याने मंगळवारी (ता. 25) होणाऱ्या महासभेत नगरसेवकांनी कितीही बोला, दोन दिवस सभा चालविण्याची माझी तयारी असल्याचे सांगितले. 

आचारसंहितेमुळे चार वेळा महासभा तहकूब केल्याने नगरसेवक मेटाकुटीला आले आहेत. गेल्या गुरुवारी झालेल्या महासभेत 50 कोटींहून अधिक विषयांना एका मिनिटात मंजुरी दिल्याने महापौरांवर विरोधी पक्ष तुटून पडले होते. किमान कुठल्या विषयांना मंजुरी दिली, याची माहिती सभागृहाला मिळणे आवश्‍यक असल्याची भूमिका नगरसेवकांची होती. घाईघाईने विषय मंजूर करण्यासाठी आचारसंहितेचा व राष्ट्रगीताचा आधार घेऊन कोट्यवधींचे विषय मंजूर करायचे, हा महापौरांचा डाव असल्याची टीका करण्यात आली होती. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, पावसाळीपूर्व कामे याबद्दल प्रश्‍न मांडता न आल्याने महापौरांवर रोष व्यक्त करण्यात आला. त्यात सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील नगरसेवकांचा समावेश होता. टीकेचा रोख लक्षात घेता महापौर भानसी यांनी तातडीने 25 जूनला महासभा घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार मंगळवारी (ता. 25) सभा होत आहे. या सभेत नगरसेवकांना जितके बोलायचे तितके बोलू द्या, आता माझंही ठरलंय कोणाला नाराज करायचे नाही. दोन दिवस सभा चालली तरी चालेल, असे सांगत महापौरांकडून नगरसेवकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न राहील. अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांचे वडील मुनिरोद्दीन सय्यद यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून सभा काही काळासाठी तहकूब केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू होईल. 

नगरसेवकांना कानपिचक्‍या 
गेल्या आठवड्यात होणाऱ्या महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांसह आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याची बाब आमदार बाळासाहेब सानप यांच्या जिव्हारी लागली आहे. टीका करताना सांभाळून राहा, असा सज्जड दम त्यांनी काही नगरसेवकांना रामायण येथे भरल्याने नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. आम्ही कामांसाठी न्याय मागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आज होणाऱ्या महासभेत सभागृहनेते दिनकर पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडून विविध मुद्यांवर सभागृहात आंदोलनाची तयारी करण्यात आली असून, भाजपला घरचा आहेर मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor says now I have decided