वैद्यकीयसाठी पुन्हा भरा प्रेफरन्स फॉर्म

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

 वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर यापूर्वी पहिल्या व दुसऱ्या फेरीत झालेले प्रवेश रद्द ठरविण्यात आले आहेत.

नाशिक - वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर यापूर्वी पहिल्या व दुसऱ्या फेरीत झालेले प्रवेश रद्द ठरविण्यात आले आहेत. राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फॉर्म भरणे आवश्‍यक असून, त्यासाठी रविवारपर्यंत (ता. १२) मुदत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एमडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात सुधारित वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षणात झालेल्या बदलांनुसार जागांच्या विभागणीचा तपशील अर्थात मॅट्रिक्‍स गुरुवारी उपलब्ध करून दिला आहे. 

सुधारित गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता. १०) जारी करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फॉर्म भरण्याची मुदत रविवारी रात्री बारापर्यंत आहे. संकेतस्थळावर सिलेक्‍शन लिस्ट सोमवारी (ता. १३) रात्री आठनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मंगळवारपासून (ता. १४) गुरुवार (ता. १६) सायंकाळी पाचपर्यंत मुदत असेल. मॉपअप राउंडसाठी रिक्‍त जागांचा तपशील १६ मेस जाहीर केला जाणार असून, निवड यादी १७ मे रोजी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज सादरीकरणासाठी १८ ते २० मेदरम्यान मुदत असेल. इन्स्टिट्यूटच्या स्तरावरील फेरीअंतर्गत खासगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक मेडिकल, डेंटल कॉलेजमधील रिक्‍त जागांच्या प्रवेशासंदर्भातील प्रवेशप्रक्रिया २१ मेपासून पार पडेल.

कागदपत्रे, भरलेले शुल्क मिळणार परत
यापूर्वी दोन फेऱ्यांत झालेले प्रवेश रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर प्रवेश निश्‍चित विद्यार्थ्यांना त्यांची मूळ कागदपत्रे आणि अदा केलेले शुल्क परत मिळणार आहे. प्रवेश घेतलेल्या इन्स्टिट्यूटमधून ही कागदपत्रे व शुल्क विद्यार्थ्यांना प्राप्त करून घेता येतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical form to fill out