वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणार : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवारच्या कामाला भेट
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि इंदिरा आवास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना भेट दिली. इंदिरा आवास योजनेत घर बांधलेल्या पोहऱ्या वळवी यांच्याकडून त्यांनी घरबांधणीसाठी मिळालेले अनुदान आणि घरात शौचालय बांधण्याबाबत चर्चा केली.

नंदुरबार : ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून सातपुड्यातील कुपोषणावर मात करता येऊ शकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.

नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जि. प. अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ. विजयकुमार गावित, के. सी. पाडवी, उदेसिंग पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे आदी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ''एनआरसीद्वारे 15 दिवस उपचार केल्यानंतर बाळाच्या औषधोपचारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकींग सिस्टीम विकसित करावी. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील आश्रमशाळेत पोषण आहार वेळेत पोहोचण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानात चांगले काम केले आहे. तसेच ‘मागेल त्याला शेततळे ’ योजनेंतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले आहे. मागणीनुसार जागा उपलब्ध असेल, तर शेततळ्याचे उद्दिष्ट वाढवून त्यासाठी निधी देण्यात येईल. सोलर कृषीपंपाचे उद्दिष्ट 200 पर्यंत वाढवून त्यासाठीही निधी देण्यात येईल.'' 

मार्च 2018 पर्यंत सर्व महसुली गावे विजेने जोडली जातील. या कामात वन विभागाची काही अडचण असल्यास ती तातडीने दूर करावी. विजेचा तुटवडा भासल्यास मध्य प्रदेश सरकारशी बोलून वीज उपलब्ध करून घेवू. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी अक्कलकुवा, धडगाव, अक्राणी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या आंब्यावर प्रक्रिया करुन आमचुराचा ब्रैंड तयार करण्यात यावा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामांमध्ये गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा तालुका व योजनानिहाय आढावा घेतला. 

मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवारच्या कामाला भेट
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि इंदिरा आवास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना भेट दिली. इंदिरा आवास योजनेत घर बांधलेल्या पोहऱ्या वळवी यांच्याकडून त्यांनी घरबांधणीसाठी मिळालेले अनुदान आणि घरात शौचालय बांधण्याबाबत चर्चा केली.

फडणवीस यांनी अमृत पाडवी यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. तीर-कमान आणि शिबली (फुलांची टोपली) देऊन पारंपरिक पध्दतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंगरी विकास योजनेंतर्गत मोलगी येथे बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भगदरी ते चिकपाणी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Web Title: medical officer posts will fill immediately says Devendra Fadnavis