"जलयुक्त'च्या बैठकीतून आमदारांचा "सभात्याग' 

"जलयुक्त'च्या बैठकीतून आमदारांचा "सभात्याग' 

नाशिक - "जलयुक्त'च्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील आमदार योजनेच्या निकषातील सुधारणांबाबत सूचना मांडत असताना जलसंपदा विभागाचे मंत्रिपद असलेले पालकमंत्री गिरीश महाजन मधूनच उठून गेले. याचा निषेध करीत आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी "सभात्याग' केला. पालकमंत्री महाजन यांनी त्यानंतर संबंधितांच्या 80 टक्के सूचना ऐकल्या असताना लोकप्रतिनिधींनी बैठकीतून जायला नको होते, असे सांगत बाजू मांडली. 

अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप यांनी "जलयुक्त'च्या कामांची माहिती देताना जलयुक्त योजनेच्या कामासाठी जिल्ह्याला 180 कोटींचा निधी मिळाला. गेल्या वर्षीच्या जलयुक्त कामांमुळे 41803 स.घ.मी. (टीसीएम) पाणीसाठा झाला. पुढील वर्षात सहा हजार 69 कामे प्रस्तावित आहेत. 142 कोटी रुपयांपैकी 91 कोटी खर्च झाले आहेत. 218 गावांपैकी 49 गावे जलयुक्त करण्यात यश आले. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी नाशिक जिल्हा पात्र ठरला आहे. शेततळ्यासाठी 18 हजारांवर अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार 600 लाभार्थ्यांना शेततळे देण्याचे नियोजन आहे, असे सांगितले. तसेच, या वेळी चांदवड तालुक्‍याला राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, त्याबद्दल तालुक्‍यातील अधिकारी व आमदारांचा सत्कार झाला. 

"जलयुक्त'च्या निकषावर नाराजी 
आमदार निर्मला गावित म्हणाल्या, ""जलयुक्त योजनेची कामे सरसकट निकष लावून केली जातात. पावसाळी भागात गाळ नसतो. तेथे गाळ काढायची कामे कशी होणार?'' लहान-लहान बंधारे बांधले; पण गेल्या वर्षीच्या पुरात बंधारे वाहून गेले. आता पाणी नसल्याने टॅंकर मागितल्यास नाशिक तालुक्‍यात टॅंकर दिले जात नाहीत, अशी तक्रार आमदार योगेश घोलप यांनी केली. आमदार अनिल कदम यांनी "जलयुक्त'साठी जी गावे निवडली जातात, त्यांचे निकष काय इथपासून विषयाची सुरवात केली. "जलयुक्त'ची कामे केलेल्या गावांत व भागात पाण्याच्या टॅंकरची मागणी सुरू आहे. केवळ संबंधित गाव जलयुक्त झाले आहे म्हणून लागलीच त्या गावातील पाणीटॅंकरही बंद करणे योग्य नाही. त्याऐवजी "जलयुक्त'च्या कामांची स्थिती तपासावी, तसेच पूर्व व पश्‍चिम पट्ट्यातील जादा पावसाच्या तालुक्‍यात एकसारख्या पद्धतीने केलेली कामे लाभदायक ठरत नसल्याची व्यथा विविध आमदारांनी मांडली. 

सभात्याग अन्‌ फरफटीची कबुली 
दरम्यान, लोकप्रतिनिधी सूचना मांडत असतानाच पालकमंत्री बैठकीतून ऍटी चेंबरमध्ये गेल्याने जे. पी. गावित, निर्मला गावित, नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण आदी आमदारांनी सभात्याग केला. आमदार कदम यांनी, "तुम्ही निघून जाऊ शकता, आमची सत्तेमागची फरफट सुरू आहे,' असे सांगत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी म्हणून होणाऱ्या घुसमट व फरफटीची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. 

केंद्रीय योजना - तोकडे उद्दिष्ट 
शेततळ्याच्या विषयावर आमदार राजाभाऊ वाजे यांनी, त्यांच्या सिन्नर तालुक्‍यातील योजनांत तोकड्या उद्दिष्टाचा विषय मांडला. केंद्र सरकारच्या योजनांसाठी मागणी अर्ज करणारे खूप मोठ्या संख्येने आहेत. पण, त्यांची निवड होत नाही. 128 गावांच्या तालुक्‍यात दोन ट्रॅक्‍टर मिळणार आहेत. नऊ शेडनेट, दोन पॉलिहाउस, चौघांना शेती अवजारे मिळणार आहेत. हे सर्व तोकडे आहे, असाच सूर विविध आमदारांनी मांडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com