mehrun dam butterfly
mehrun dam butterfly

तलाव परिसरात 55 प्रकारचे फुलपाखरू 

जळगाव ः निसर्गाच्या जीवनचक्रात फुलपाखरांचे मोठे महत्त्व असून, फुलपाखरू परागीकरण करत असल्याने विविध पक्षी, कीटक, झाडे यांच्यावरील जैवविविधता वाढत असते. शहरातील मेहरुण तलाव परिसरात 55 प्रकारचे फुलपाखरू आढळून येत असल्याच्या नोंदी तलावावरील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या रेवान चौधरी या विद्यार्थ्याला आढळून आल्या आहेत. 
मेहरुण तलाव हा निर्सगसंपन्न असा परिसर असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे झाडे, तसेच वनस्पती असल्याने विविध पक्षी, जीवजंतू सोबत फुलपाखरुंचा देखील अधिवास आहे. कोणत्याही परिसरात सुमारे 50 प्रकारचे फुलपाखरू आढळून येतात. त्यामुळे मेहरुण तलावावर देखील 55 प्रकारचे फुलपाखरू आढळून येत असले तरी येथे फुलपाखरांची संख्या चांगली असल्याने तलावावरील परागीकरण, पक्ष्यांची संख्या यामुळे वाढण्यास मदत होत आहे. 

परिसरात हवे "बटरफ्लाय' गार्डन 
मेहरुण तलाव परिसर निसर्गसंपन्न आहे. परंतु, या ठिकाणी अजूनही फुलपाखरांची विविध प्रजातींची संख्या वाढविण्याची गरज आहे. फुलपाखरू हे विविध प्रकारचे "होस्टप्लॅन्ट'वर अंडी घालतात. तर "नेक्‍टर प्लॅन्ट'वर परागीकरण करतात. "होस्टप्लॅन्ट'चे (झाडे) प्रकार मोठ्या प्रमाणात असल्याने ते पूर्ण लावणे शक्‍य नाही. त्यामुळे काही प्रमाणात ही झाडे लावून परागीकरणासाठी आठ प्रकारचे नेक्‍टर प्लॅन्ट (झाडे) जर  तलावाच्या परिसरात महापालिकेच्या शिवाजी गार्डनमध्ये लावल्यास हे ठिकाण "बटरफ्लाय' गार्डन होऊ शकते. 

"व्हाइट अरब' फुलपाखरूचा शोध 
फुलपाखरू अभ्यासक उमेश पाटील हे खानदेशातील विविध प्रजातींच्या फुलपाखरूंवर पीएच.डी. करत आहेत. त्यांना खानदेशात 118 तर जिल्ह्यात 96 विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यात त्यांना अरब देशात आढळून येणारे "व्हाइट अरब' हे फुलपाखरू जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद, तरसोद, एरंडोल आदी भागात आढळून आले आहे. अरब देशात आढळणारी मिसवाक झाडे खानदेशातील शेतांच्या बांधावर मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हे व्हाइट अरब फुलपाखरू पाकिस्तान, राजस्थान, गुजरात मार्गे मिसवाक झाड्याच्या माध्यमातून येत असल्याची शक्‍यता श्री. पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 


खानदेशात व जिल्ह्यात फुलपाखरुंचा अभ्यास करताना अनेकविध प्रकारचे फुलपाखरू आढळून येतात. मेहरुण तलाव देखील फुलपाखरूंसाठी एक चांगले ठिकाण असून, येथे अजून फुलपाखरांना पोषक असलेली झाडे लावल्यास येथे विविध प्रकारच्या फुलपाखरांची संख्या नक्कीच वाढण्यास मदत होईल. 
- उमेश पाटील, फुलपाखरू अभ्यासक. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com