चाळीसगाव : जामद्यातील दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

दीपक कच्छवा 
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मेहुणबारे पोलिसांनी जामदा गावात धाड टाकली मात्र पोलिस कारवाई भीतीने गावात दारु विक्री बंद झाली आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : जामदा (ता. चाळीसगाव) गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूसह सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने निवेदन महिलांनी दिले होते. या निवेदनाची दखल घेत मेहुणबारे पोलिसांनी जामदा गावात धाड टाकली मात्र पोलिस कारवाई भीतीने गावात दारु विक्री बंद झाली आहे.

जामदा (ता. चाळीसगाव) येथील संतप्त झालेल्या गावातील सुमारे दोनशे महिलांनी रणरागिणी होऊन पोलिस ठाण्यावर धडक दिली. आज मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह उपनिरीक्षक हेमंत शिंदे, भटू पाटील, कमलेश राजपूत, दर्शना पाटील यांच्या पथकाने आज सायंकाळी साडेपाचला वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथे गावात धडक दिली. याठिकाणी गावाच्या बाहेर गावठी दारू विक्री करणाऱ्या एकावर कारवाई केली. या दारुआड्यावर दारु पिण्यासाठी आलेल्या ग्राहकाला देखील अटक करण्यात आली. यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामदा गावात देखील कारवाई केली.

जामदा गावात ज्या भागात दारू विक्री केली जाते. त्या भागात सायंकाळी साडेपाचला मोहीम राबवली होती. पोलिसांच्या कारवाईच्या धसक्याने अनेकांनी दारु विक्री करणे बंद केले होते. साहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी या कारवाईकरिता दारु विक्रेत्यांना समजू नये यासाठी पोलिस गाडी न घेता खाजगी गाडीने जामदा व वडगावलांबे या गावात कारवाया करण्यात आल्या. या झालेल्या कारवाईमुळे दारु विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग नावालाच चाळीसगाव तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पाहिजे तशा कारवाया केल्या जात नाही. त्यामुळे त्यांच्या कामावर आता ग्रामस्थांना विश्वास राहिला नसुन चाळीसगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग फक्त नावालाच उरला आहे. दारू विक्रेत्यांशी साटेलोटे असल्यानेच कारवाया होत नाहीत. या विभागाचे कार्यालय फक्त नावालाच उरलेले आहे. ग्रामीण भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या गावठी दारूमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेऊनही दारूबंदीचे ठराव देखील करण्यात आले आहे. या ठरावांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे या विभागाचे काम पोलिसांना करावे लागत आहे.

परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर पोलिसांना तातडीने कळवावे. जेणे करून कारवाई करता येईल. याकामी ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. - सचिन बेंद्रे, साहाय्यक पोलिस निरीक्षक मेहुणबारे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehunbare police raid on liquor shop in jamda