नाशिकच्या क्षितिजावर मेट्रोचे झुंजुमुंजु

Metro
Metro

नाशिक - नाशिकच्या वाढत्या विस्तारामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा सावरण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महामेट्रो, सिडको व महापालिकेतर्फे शहरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन महिन्यांत नगरविकास विभागाला व्यवहार्यता अहवाल सादर केला जाईल. त्यातून मेट्रोचे संकेत मिळाले आहेत.

मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ नाशिकमध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे. मुंबई, पुणे व नागपूर येथे येत्या काळात मेट्रो धावणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील सुविधा म्हणून वेगाने विस्तारणाऱ्या शहरांतदेखील सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यात प्रथम नाशिकला पसंती देण्यात आली असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मेट्रोसाठी नाशिकमध्ये सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांतच वेगाने पावले उचलली गेली असून, महामेट्रो, सिडको या शासकीय संस्थांसह महापालिका या तीन संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे. ‘महामेट्रो’चे अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. 

का घेतली दखल?
नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुबळी असल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. शहरात दररोज छोटी-मोठी पावणेतीन लाख वाहने रस्त्यावर धावतात. रस्ते रुंदीकरणाला मर्यादा असल्याने विविध ठिकाणी वाहतूक ठप्प होऊन हवा व ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याशिवाय शहरात पार्किंगचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने त्यातून दररोज वाद होतात. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रारी झाल्याने त्याची दखल घेत त्यांनी नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात महापालिकेतर्फे बसगाड्या चालवल्या जाणार असून, येत्या सहा महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाची शहर बससेवा पूर्णपणे बंद होईल. बससेवा सुरू करताना दुसरीकडे मेट्रोचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मिनी मेट्रोची शक्‍यता
महापालिकेने वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करण्यासाठी दिल्लीतील यूएमटीसी कंपनीला काम दिले होते. कंपनीने शहरात मेट्रो व्यवहार्य नसल्याचे स्पष्टीकरण अहवालात दिले होते. मेट्रो परवडण्यासाठी तेवढ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या असणे गरजेचे आहे. किमान देखभाल व दुरुस्तीचा खर्च प्राप्त होणे अपेक्षित आहे. परंतु नाशिकमध्ये मेट्रोचा खर्च निघेल की नाही, याबाबत साशंकता असल्याने मिनी मेट्रोचा प्रस्ताव सरकारला सादर होण्याची शक्‍यता आहे.

पाटबंधारेच्या कालव्यावर मेट्रो शक्‍य
नाशिक शहरातून गंगापूरचा उजवा कालवा गेला आहे. त्याचे अंतर सुमारे चाळीस किलोमीटर असून, त्यातील २० किलोमीटरचे पाट महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. शहराच्या बाह्य भागातून हा कालवा गेला आहे. या कालव्यावर महापालिकेचे आठ जॉगिंग ट्रॅक आहेत. मेट्रोसाठी या कालव्याचा विचार होऊ शकतो. सध्या ड्रेनेजलाइन अथवा अन्य पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कालव्याचा वापर होत आहे. काही भागात बांधकामेदेखील झाली आहेत. कालव्याच्या काही भागावर झोपडपट्ट्या स्थिरावल्या आहेत. मेट्रोसाठी अतिक्रमण हटविणे महापालिकेला सहज शक्‍य आहे. या कालव्यावरून मेट्रो सुरू झाल्यास भूसंपादनाचा प्रश्‍न तत्काळ निकाली लागू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com