एमआयडीसीत ‘बर्निंग ट्रक’चा थरार

जळगाव - एमआयडीसी भागात मंगळवारी दुपारी ट्रकला लागलेली आग.
जळगाव - एमआयडीसी भागात मंगळवारी दुपारी ट्रकला लागलेली आग.

जळगाव - बारदान घेऊन जाणाऱ्या ट्रकला खुल्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने मोठी आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करीत ट्रकमधील बारदान खाक झाले. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेतल्याने जीवितहानी टळली. आज दुपारी दोनच्या सुमारास एमआयडीसी भागात ‘बर्निंग ट्रक’चा थरार घडला. 

औद्योगिक वसाहत परिसरातील भोजराज बारदान कारखान्यातून ट्रकचालक विष्णू आपटे त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच १९, झेड २९९७) घेऊन दुसऱ्या कंपनीत माल घेऊन निघाला होता. ढोर बाजाराच्या दिशेने हॉटेल वासुमित्राकडे येतानाच रुखमा इंडस्ट्रीजच्या मागील दारावर ट्रक असताना रस्त्याच्या मधून लोंबकळणाऱ्या वीजतारांना बारदान बंडलचा स्पर्श होऊन तारांमध्ये स्पार्किंग झाल्याने काही मिनिटातच ट्रकने पेट घेतला. चालक व क्‍लिनरने प्रसंगावधान राखत ट्रकला ब्रेक लावत उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, वीजप्रवाह सुरू असलेल्या तारा रस्त्यावर कोसळून डीपीलाही आग लागली होती. एमआयडीसी येथील अग्निशामक केंद्रावर बंब उपलब्ध नसल्याने शहरातून बंब मागविण्यात आले. मात्र, तोवर अर्धा ट्रक जळून खाक झाला होता.

दीड तासांत आग अटोक्‍यात
वीज विभागाचे कर्मचारी आल्यावर डीपीवरील पुरवठा खंडीत करून दोन मोठे व एक लहान बंबांद्वारे सलग पाण्याचा मारा ट्रकवर करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अमोल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत या पोलिस कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र पाण्याचा मारा करुनही आग अटोक्‍यात येत नसल्याने अखेर जेसीबी मशिन बोलावून ट्रकमधील पेटते गोणपाट खाली ओढण्यात येऊन आग विझविण्यात आली.

कंपनीसह चालकही दोषी 
भोजराज इंडस्ट्रीज येथून बारदान बंडल भरणाऱ्या चालकाने कंपनी मालकाला जास्त माल लोड करू नका, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकून न घेता गाडीच्या उंचीपेक्षा जास्त माल लोड केल्याचे आपटे याने सांगितले. 

दरम्यान, एमआयडीसीत बऱ्याच रस्त्यावर लोंबकळणाऱ्या वीजतारा असून, वारंवार परिसरातील उद्योजकांनी तक्रारी करूनही उपयोग होत नसल्यानेच हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी कंपनीतील लोकांनी माहिती देताना सांगितले. 

अग्निशामक दल, ‘महावितरण’ही ‘लेट’
घटनेनंतर दिलेल्या पत्त्यावर बंब पोचला. मात्र, रेमंड चौकात रस्त्यावरच प्रवेशद्वाराचे काम सुरू असल्याने बंब फिरवून आणावा लागल्याने त्यात वेळ गेला. तर ‘महावितरण’चे कर्मचारीही उशिरा पोचले. सुदैवाने आगीच्या घटनेत चालक क्‍लिनरने उडी घेतल्याने व शेजारीच कंपनीतील कोणी कामगार-वाहन चालक घटना घडली तेव्हा रस्त्यावर नसल्याने पडलेल्या वीजतारांमुळे अप्रिय घटना घडली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com