एमआयडीसीला ‘उद्योग नगरी’चा दर्जा मिळावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

जळगाव - औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका व एमआयडीसी अशा दोघा संस्थांच्या माध्यमातून दुहेरी कराची आकारणी केली जात आहे, त्या मोबदल्यात सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. त्यामुळे जळगाव एमआयडीसीला ‘उद्योग नगरी’चा दर्जा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी येथील उद्योजकांनी आज भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली. 

जळगाव - औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका व एमआयडीसी अशा दोघा संस्थांच्या माध्यमातून दुहेरी कराची आकारणी केली जात आहे, त्या मोबदल्यात सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. त्यामुळे जळगाव एमआयडीसीला ‘उद्योग नगरी’चा दर्जा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी येथील उद्योजकांनी आज भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली. 

जळगावातील उद्योजकांचे प्रश्‍न, समस्या जाणून घेण्यासाठी भाजप उद्योग आघाडीतर्फे भाजप कार्यालयात दुपारी ही बैठक झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर, उपाध्यक्ष दिलीप इंगळे, श्री. रणधीर, प्रशांत पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर आदी उपस्थित होते.

बराचवेळ चाललेल्या या बैठकीत जळगावातील उद्योजकांनी औद्योगिक वसाहत परिसरातील समस्या, उद्योजकांचे प्रश्‍न, सरकारचे धोरण यासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या उद्योजकांनी मांडल्या. उद्योगमित्र बैठकीत मांडलेले प्रलंबित प्रश्‍न, उद्योजकांना सरकारकडून असलेल्या अपेक्षा, येणाऱ्या अर्थसंकल्पातील तरतुदींच्या संदर्भात सूचनाही उद्योजकांनी सांगितल्या. 

‘सेतू’ बनून काम करेल
या सर्व समस्यांच्या संदर्भात भूमिका मांडताना श्री. पेशकर म्हणाले, अनेक वर्षांपासूनचे हे प्रश्‍न सरकारस्तरावर मांडण्यात येतील. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व उद्योजकांमधील ‘सेतू’ बनून आपण काम करणार आहोत. येणाऱ्या काळात या सर्व प्रश्‍नांच्या संदर्भात आपल्याला सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

उद्योजकांनी मांडलेले विषय
दुहेरी कराची आकारणी नको, उद्योगनगरीच्या दर्जासाठी प्रयत्न, चटई उद्योगासाठी प्लास्टिकच्या पुनर्वापराला प्रोत्साहन, मूलभूत सुविधांवर भर द्यावा, विदर्भाच्या धर्तीवर वीजदरात सवलत मिळावी, धुळ्याचे कार्यालय जळगावी आणावे, बजेटमध्ये एक्‍साईजची मर्यादा दीड कोटीवरुन ५ कोटींपर्यंत वाढवावी, आदी मागण्या करण्यात आल्या. 

यांची होती उपस्थिती
या बैठकीला ‘जिंदा’च अध्यक्ष भुवनेश्‍वरसिंग, संजय तापडिया, रवींद्र लढ्ढा, अंजनीप्रसाद मुंदडा, सुशील थोरात, दिनेश राठी, हरीश यादव तसेच अन्य औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योग आघाडीचे चंद्रकांत बेंडाळे, कंवरलाल संघवी, अरुण बोरोले, भास्कर बोरोले, प्रवीण कुळकर्णी, नितीन इंगळे, महिला उद्योजिका ज्योती महाजन, उज्वला बेंडाळे आदी उपस्थित होते. 

Web Title: MIDC industry with quality