पलायन केलेली गर्भवती बंदी महिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

गेल्या शुक्रवारी (ता. 13) सईदाने आपल्या मुलासह दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून पोबारा केला होता. बाथरुमला जाण्याचा बहाणा करीत, तिने सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले होते.

नाशिक - दोन दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेली न्यायालयीन कोठडीतील महिलेने पलायन केले असता, आज सकाळी ती स्वत: पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. कारागृह प्रशासनाकडून तिच्यावर कडक सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवस बुरखा घालून शहरात फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. 

सईदा रफिक शेख (24, रा. मालेगाव. सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह) ही 9 महिन्यांची गर्भवती महिला गेल्या गुरुवारी (ता. 12) सायंकाळी जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. सईदासोबत तिचा 2 वर्षांचा मुलगा अरबाजही होता. तर तिच्यावर नजर ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या दोन महिला कर्मचारी होत्या. गेल्या शुक्रवारी (ता. 13) सईदाने आपल्या मुलासह दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून पोबारा केला होता. बाथरुमला जाण्याचा बहाणा करीत, तिने सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सईदा गर्भवती असल्याने तिच्या शनिवारी (ता. 14) सिझेरियन शस्त्रक्रिया केली जाणार होती. परंतु त्यापूर्वीच तिने जिल्हा रुग्णालयातून पोबारा केला होता. मात्र आज सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान, बुरखा घातलेली सईदा पुन्हा जिल्हा रुग्णालयामध्ये स्वत:हून अवतरल्याने सारेच अवाक्‌ झाले. सदरची खबर तात्काळ सरकारवाडा पोलिस व मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला देण्यात आली. गर्भवती असल्याने तिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिच्यावर नजर ठेवण्यासाठी तीन महिला व एक पुरुष कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. मालेगाव येथील खूनप्रकरणी पतीसह तिला अटक करण्यात आली असून गेल्या नोव्हेंबर 2017 पासून दोघेही न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात दाखल आहेत. 

बुरखा घालून भटकंती -
जिल्हा रुग्णालयातून पलायन केल्यानंतर सईदा हिने बुरखा परिधान करून शहरात भटकंती केली. गर्भवती आणि सोबत लहान मुलगा यामुळे ती ओळख पटणे सहज शक्‍य होते परंतु, तिने बुरखा परिधान केला होता. त्यामुळे अनेकांना तिला ओळखणे कठीण गेले असावे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तिला प्रसुतीमुळे पोटदुखीचा त्रास सुरू होता. त्यामुळेच तिने पुन्हा जिल्हा रुग्णालयात येण्याशिवाय गत्यंतर राहिले नसावे अशी शक्‍यता आहे. मात्र ती सुखरुप जिल्हा रुग्णालयात परतल्याने अनेकांची सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Migrant pregnant women again in district hospital