धोकादायक वाड्यांतून रहिवाशांचे स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जुने नाशिक - येथील काळेवाडा रविवारी (ता. ५) कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आसपासच्या धोकादायक वाड्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातील काहींनी घटनेच्या काही वेळानंतर, तर काहींनी सोमवारी (ता. ६) सकाळी अन्य ठिकाणी स्थलांतर केले.

जुने नाशिक - येथील काळेवाडा रविवारी (ता. ५) कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आसपासच्या धोकादायक वाड्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातील काहींनी घटनेच्या काही वेळानंतर, तर काहींनी सोमवारी (ता. ६) सकाळी अन्य ठिकाणी स्थलांतर केले.

तांबट लेन येथील काळेवाडा रविवारी (ता. ५) दुपारी कोसळून ढिगाऱ्याखाली पाच जण दबले होते. अग्निशमन दल आणि तरुणांच्या मदतीने पाच जणांना बाहेर काढले. त्यात समर्थ काळे व त्याचा मित्र करण घोडके यांचा मृत्यू झाला होता. पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, आमदार देवयानी फरांदे घटनास्थळी भेट दिली होती. श्री. महाजन यांनी धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना स्थलांतर कसे करता येईल, याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. सायंकाळी मदतकार्य संपताच सातच्या सुमारास आयुक्त मुंढे पुन्हा तांबट लेनमध्ये दाखल झाले. त्यांनी धोकादायक वाड्यांची पाहणी केली. २५ वाडेधारकांना नोटीस बजावून तीन दिवसांत वाडे रिकामे करण्याच्या सूचना केल्या. तत्पूर्वी, घटनेची तीव्रता लक्षात घेता परिसरात अन्य धोकादायक वाड्यांतील काही रहिवाशांनी रविवारी दुपारीच स्थलांतर केले. अपघातग्रस्त वाड्याशेजारील वाड्यातील रहिवाशांनी सोमवारी (ता. ६) सकाळी स्थलांतर केले. स्थलांतरासाठी सामान काढण्यास गेलेल्या रहिवाशांत भीती होती. 

समर्थ काळेवर अंत्यसंस्कार
काळेवाडा कोसळून मृत झालेल्या करण घोडकेवर रविवारी (ता. ५) रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. समर्थ काळेवर सोमवारी (ता. ६) सकाळी दहाच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातग्रस्त काळेवाड्याच्या बाहेरूनच अंत्ययात्रेस सुरवात झाली. आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक गजानन शेलार, माजी नगरसेवक संजय चव्हाण, शंकर बर्वे, राहुल बर्वे आदी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धोकादायक वाड्यांची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे, तसेच समर्थ, करण यांच्या कुटुंबीयांना अधिक शासकीय मदत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाड्यांसाठी सर्वच सरसावले
तांबट लेनमधील वाडा पडल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी तर झालीच शिवाय वाडे पडण्याच्या भीतीने आता नागरिकदेखील बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे तडजोडीसाठी बिल्डर्स लॉबी सरसावली असून, वाडे खाली करण्यासाठी ठराविक रक्कम किंवा उपनगरांमध्ये फ्लॅट देऊन वाडे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title: Migrating residents through dangerous wada