यंदा दुधाचा महापूर आटणार

विजय मोरे
रविवार, 28 एप्रिल 2019

गावाची आर्थिक परिस्थिती दुधावरच अवलंबून आहे. मात्र, दररोज पाणीटंचाई तीव्र बनत चालली आहे. गावात एक टॅंकर येतो, तीन खेपा होतात. मात्र पाणी पुरत नाही. मग गावात खासगी टॅंकरनेही पाणी मागवले जाते. एकूणच गावाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 
- राधेश्‍याम खोमणे, जळगाव सुपे 

जळगाव सुप्यातील २९० जण रोजगार हमीच्या कामावर
उंडवडी - बारामती तालुक्‍यातील जळगाव सुपे या एकाच गावात उच्चांकी ७ हजार लिटर दूध उत्पादन होते. येथे दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या येथे पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. त्यातच चाराही उपलब्ध नाही. त्याचा परिणाम दुधावर होत आहे. ग्रामस्थांच्या हाताला काम नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून २९० जण रोजगार हमी योजनेवरील पाझर तलावाचे गाळ काढण्याची काम करीत आहेत.

जळगाव सुपे गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास आहे. दुधाच्या उत्पादनात अग्रेसर असलेले गाव, अशी जिरायती भागात या गावाची ख्याती आहे. आज या दुष्काळाच्या खाईतही गावातून ९ हजार ५०० लिटर दूध उत्पादित होते. त्यावर निम्म्या गावाचा प्रपंच अवलंबून आहे. आता तोही धंदा अडचणीत सापडला आहे. मागील दोन- तीन वर्षांत गावात ओढा खोलीकरणाची कामे झाली. त्यातून मागील वर्षी पाण्याच्या टंचाईवर काही अंशी गावाने मात केली. मात्र, तीन वर्षांत सलग पाऊस कमी होत राहिल्याने गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यातही पाणीटंचाईचा सामना यंदा मात्र अधिकच तीव्रतेने करावा लागला. उभी पिके शिवारात नाहीत.

परिणामी, हिरवा चारा नाही. प्यायला पाणी नाही. त्यामुळे जनावरांचा प्रश्न अधिकच गंभीरपणे समोर उभा राहिला आहे. अगोदरच दुधाला दर कमी असल्याने दूध धंदा परवडत नाही. त्यात अव्वाच्या सव्वा दराने हिरवा चारा विकत घेण्याच्या शक्‍यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

सध्या काहीच काम नसल्याने गावातील २९० जण गावातील पाझर तलावाच्या गाळउपसा कामावर जात आहेत. त्यामध्ये २१० महिला आहेत.

चार महिन्यांपासून हे रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे. मागील आठवड्यापासून तांत्रिक अडचणीमुळे हे काम बंद झाले. त्यामुळेही गावातील नागरिक हवालदिल आहेत. बारामतीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी हे काम दोन दिवसांत पुन्हा सुरू होईल, असे सांगितले आहे; तसेच गावातील काही जण बारामती शहरात जाऊन काम शोधत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk Shortage Water Issue Employment Fodder Shortage Animal