बाजरीची भाकरी होणार महाग? कारण असं की...

संतोष कांबळे : सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 1 डिसेंबर 2019

गव्हाच्या पोळीपेक्षाही बाजरीची भाकरी महाग होण्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी कापणी वेळेवर न झाल्याने बाजरीच्या कणसांना कोंब फुटले, तर अनेक ठिकाणी बाजरीचे दाणेच काळे पडले. या खरीप हंगामातील बाजरी मागच्या खरीप हंगामातील बाजरीपेक्षा निकृष्ट दर्जाची असून, पावसात पीक भिजल्यामुळे भाकरीला लाल रंग येणे, भाकर बेचव लागणे, असे प्रकार घडले आहेत.

नाशिक : खरीप हंगामात परिसरातील शेतकऱ्यांनी लागवड केलेले बाजरीचे पीक अवकाळी पावसामुळे पूर्णत: वाया गेले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात बाजरीची भाकरी ताटात येणे दुरापास्त होणार आहे. गव्हाच्या पोळीपेक्षाही बाजरीची भाकरी महाग होण्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी कापणी वेळेवर न झाल्याने बाजरीच्या कणसांना कोंब फुटले, तर अनेक ठिकाणी बाजरीचे दाणेच काळे पडले. या खरीप हंगामातील बाजरी मागच्या खरीप हंगामातील बाजरीपेक्षा निकृष्ट दर्जाची असून, पावसात पीक भिजल्यामुळे भाकरीला लाल रंग येणे, भाकर बेचव लागणे, असे प्रकार घडले आहेत.

अवकाळी पावसामुळे बाजरीची भाकरी महागणार

मागील खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा बाजरीचे उत्पादनही कमी आहे. त्यामुळे मागील हंगामातील बाजरीच सध्या तरी विक्रीसाठी उपलब्ध आहे. नवीन बाजरीचे पीक कमी आल्याने बाजरीचा दर वाढण्याची चिन्हे असून, मागील वर्षी 150 ते 200 रुपये पायली (सात किलो) असणाऱ्या बाजरीच्या दरात यंदा सरासरी पन्नास ते साठ रुपयांची वाढ होण्याची चिन्हे आहेत. शिवाय बाजरी जास्त दिवस साठवणूक करून ठेवणे अशक्‍य असल्याने नजीकच्या काळात बाजरीचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. 

Image may contain: plant, grass, nature and outdoor

   वडेल : अवकाळी पावसामुळे वाया गेलेले बाजरीचे पीक. 

हेही वाचा > प्रसुतींच्या कळांनी बिथरली होती ती...त्यातच तिला दिसला 'तो'..अन् मग

लग्नसराईतील जागरण- गोंधळात बाजरीची भाकरी अपरिहार्य

लग्नसराईतील जागरण- गोंधळाचे कार्यक्रम, नवस व जावळाच्या कार्यक्रमांत दिल्या जाणाऱ्या मांसाहारी जेवणाच्या पंक्तीत बाजरीची भाकरी अपरिहार्य पदार्थ आहे. बाजरी महागल्याने त्याचा परिणाम जेवणावळींसोबतच दैनंदिन आहारावरही होणार आहे. अनेक घरांत आजही आवडीने बाजरीची भाकरी खाल्ली जाते. अशा ठिकाणी ताटामधील बाजरीची भाकरी महागणार आहे. 

हेही वाचा > काय मनात आले त्याच्या..की सप्तश्रृंगीच्या शीतकड्यावरून उडी घेतली

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीच पुरेशी बाजरी नाही

यंदाच्या खरीप हंगामातील बाजरीचे पीक वाया गेले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीच पुरेशी बाजरी नाही, तर विक्रीसाठी कुठून आणणार? बाजरीचा तुटवडा असल्याने बाजरीचा दर गव्हापेक्षा जास्त असेल, अशी चिन्हे आहेत. - भगवान शेलार, शेतकरी, वडेल 

ग्रामीण भागात प्रत्येक घरात बाजरीची भाकरी दैनंदिन आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. यंदा बाजरीचे पीक अवकाळी पावसामुळे वाया गेल्याने बाजरीची भाकरी जेवणातून हद्दपार होईल की काय, अशी परिस्थिती आहे. - मीराबाई सोनवणे, गृहिणी, रामपुरा  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millet Bread will be expensive Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: