अत्यल्प व्याजात कर्जाचे आमिष दाखवून लाखोंना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नाशिक - अवघ्या साडेसहा टक्के व्याजाने हवे तेवढे कर्ज देण्याचे आमिष दाखवून बोरिवलीतील युनिक ग्रुप ऍण्ड कंपनीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. नाशिकच्या उद्योजक-शेतकऱ्यांना या कंपनीचा फटका बसला. या प्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

नाशिक - अवघ्या साडेसहा टक्के व्याजाने हवे तेवढे कर्ज देण्याचे आमिष दाखवून बोरिवलीतील युनिक ग्रुप ऍण्ड कंपनीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. नाशिकच्या उद्योजक-शेतकऱ्यांना या कंपनीचा फटका बसला. या प्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये रामराव पोकळे (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांची जयेश एंटरप्राइझेस कंपनी आहे. त्यांना कंपनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशिनरीज आणावयाच्या असल्याने पैशांची गरज होती. या संदर्भात त्यांनी काही मित्रांकडे बोलूनही दाखविले होते. लासलगाव येथील त्यांच्याच ओळखीतील कैलास भारती यांच्याशी त्यांचे बोलणे झाले होते. यावर भारती यांनी त्यांना बोरिवलीतील युनिक ग्रुप ऍण्ड कंपनीकडून अवघ्या 6.5 टक्के व्याजदराने कर्ज दिले जात असल्याची माहिती दिली. भारतींसमवेत पोकळे बोरिवलीत 15 डिसेंबर 2016 ला युनिक ग्रुपच्या कंपनीमध्ये गेले. या आलिशान कंपनीचे प्रमुख मंगेश कदम नामक व्यक्तीशी त्यांची ओळख करून देण्यात आली. कदम यांनी कंपनीची माहिती देत अवघे साडेसहा टक्के व्याजदर, तीन महिन्यांनी हप्ता असेल असे सांगितले. पोकळे यांची कंपनीच्या विस्तारासाठी दीड कोटी रुपये कर्जाची मागणी होती. त्यासाठी कदम यांनी कंपनीच्या नियमानुसार कर्जाच्या रकमेच्या दहा टक्के रक्‍कम आगाऊ भरावी लागते, असे सांगितले. 

पोकळे नाशिकला परत आल्यानंतर कंपनीतून त्यांना कर्जासंदर्भात सातत्याने संपर्क साधला जाऊ लागला. कंपनीचे एजंट म्हणून काम करणारे लासलगावचे कैलास भारती यांच्याकडूनही सातत्याने संपर्क साधला जात होता; परंतु पोकळे यांनी पैसे नसल्याचे कारण सांगत टाळण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही त्यांना पैसे भरा आणि 22 फेब्रुवारीला कर्जाची दीड कोटी रुपये रक्कम तुमच्या बॅंक खात्यावर वर्ग होईल, असे त्यांना भासविण्यात आले. अगदी 20 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पैसे भरले नव्हते; परंतु अवघ्या एक दिवसात दीड कोटी रुपये कर्ज उपलब्ध होणार असल्याने अखेर ते तयार झाले. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि उर्वरित रक्कम मित्रांकडून उसनवार करून त्यांनी 21 फेब्रुवारीला रात्री साडेआठला युनिक ग्रुपच्या कार्यालयात जाऊन 15 लाख रुपये जमा केले. त्यानंतर संशयित मंगेश कदम याने त्यांना कंपनीचे ओरिजिनल कागदपत्रे आणावयास सांगितले. त्यासाठी ते पुन्हा रात्री नाशिक आले आणि कागदपत्रे घेऊन 22 तारखेला सकाळी दहाला बोरिवलीतील कार्यालयासमोर पोचले. 

त्या वेळी कार्यालय बंद आणि बाहेर गर्दी पाहून त्यांना धक्काच बसला. चौकशी केली असता, जमलेले सारे जण पैसे घेण्यासाठीच त्या ठिकाणी आले होते. त्यांनीही आगाऊ म्हणून लाखो रुपये कंपनीकडे जमा केले होते. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिस ठाणे गाठून रीतसर फिर्याद नोंदविली. फसवणुकीमध्ये पाथर्डी फाटा येथीलच दत्तू बागूल यांनी पाच लाख रुपये, कैलास भारती यांनी पाच लाख रुपये भरले असून, याचप्रमाणे, बोरिवली, जळगाव, रत्नागिरी, कोल्हापूर येथील शेतकरी, उद्योजकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. 

संशयिताचे मोदी, फडणवीस यांच्यासमवेत छायाचित्र 
बोरिवलीतील नूतननगरमधील ओम श्री साई दर्शन कॉम्प्लेक्‍समध्ये संशयित मंगेश कदम याने युनिक ग्रुप ऍण्ड कंपनीचे आलिशान कार्यालय थाटले होते. कार्यालयातील कदम याच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत हात मिळवितानाचे छायाचित्र लावलेले होते. तसेच कंपनीच्या नावाचे संकेतस्थळही सुरू केलेले होते. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी आलेली व्यक्ती भारावून त्याच्या जाळ्यात अडकत होती. त्याने आगाऊ रकमा घेऊन साऱ्यांना 22 फेब्रुवारीनंतरच्या तारखा दिल्या होत्या. त्याने दिलेल्या तारखेला तो कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यांवर जमा करणार होता. 

माझी सुरवातीला इच्छा नव्हती. परंतु सातत्याने कंपनीमधून कदम आणि लासलगावचे भारती यांनी संपर्क साधला. तरीही 15 लाखांची रक्कम मी 21 तारखेला भरली आणि 22 तारखेला कर्जाची रक्कम मिळणार असल्याने निश्‍चिंत होतो. परंतु व्हायचे तेच झाले. मंगेश कदम हे नावदेखील बनावट असण्याचीच शक्‍यता आहे. 
-रामराव पोकळे, उद्योजक 

Web Title: millions of discipleship